फणसाड अभयारण्याला पर्यटकांची पसंती
मुरूड, ता. १७ (बातमीदार) ः तालुक्यात यंदा जवळपास तीन हजार मिलिमीटरहून अधिक पर्जन्याची नोंद झाली आहे. हेमंत ऋतूत विविध पशु-पक्षी, वृक्षवेलींनी सदाहरित फणसाड अभयारण्याची पर्यटकांना नेहमीच भुरळ पडते. पहाटे धुक्याने आच्छादलेला भूभाग, बागडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, गवतावरील दवबिंदू, रानपाखरांचा थवा, झाडावरून टांगोळ्या घेणारी माकडांबरोबरच विविध प्रजातीच्या पशू-पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी येतात. ऑक्टोबरपासून जवळपास साडेचारशे पर्यटकांनी अभयारण्यास भेट दिली आहे.
मुरूड आणि रोहे तालुक्यातील सुमारे ५२ चौरस किलोमीटर क्षेत्रात अभयारण्य विस्तारले असून एका बाजूला अथांग पसरलेला अरबी समुद्र तर दुसरीकडे हिरव्या गर्द वनराईने नटलेला डोंगराळ प्रदेश निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरतो. त्यामुळे वर्षभर याठिकाणी वन्यजीव निरीक्षकांचा राबता असतो.
जंजिरा संस्थानचे तत्कालीन नवाब सिद्दीने केसोलीचे जंगल म्हणून राखीव ठेवले होते. या अभयारण्यात ७०० ते ८०० विविध प्रकारच्या दुर्मिळ वनौषधी, नाना प्रकारची वृक्षसंपदा त्यामध्ये साग, निलगिरी, ऐन, किंजळ, हेद, कुडा, कांचन, सावर, अर्जुन, जांभूळ अशा महाकाय वृक्षांचा समावेश आहे. शिवाय सर्पगंधा, कुडा, कुरडू, उक्षी, घाणेरी आदी औषधी वृक्षांबरोबरच वाघेटी, बाकेरी, पळसवेल, पेंटगुळ आदी वेलींसह पाच फुटांहून अधिक लांबीची गारंबीची वेल ही अभयारण्याची वैशिष्ट्ये आहेत.
अभयारण्यात सुमारे १६६ जातींचे पक्षी आढळून येतात. त्यातील बहुतांशी स्थानिक असून नवरंग, छोटा खंड्या व अन्य काही स्थलांतरित आहेत. काही पक्षी मे, जून महिन्यात येथे पाहुणे म्हणून दिसून येतात. याखेरीज हरियाल, स्वर्गीय नर्तक, भारद्वाज, सातभाई, मोर, सर्पगरुड, सुतार, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे आदी लहान-मोठे पक्षी नेहमीच पाहावयास मिळतात.
फणसाडमध्ये शंभरहून अधिक जातीची विविध रंगांची फुलपाखरे दृष्टीस पडतात. जंगली प्राण्यांच्या सोळाहून अधिक प्रजाती येथे असून त्यात बिबटे, सांबर, रानडुक्कर, पिसोरी, साळिंदर, खवले मांजर, रान ससे, कोल्हे आदींचा समावेश आहे. तर, २८ प्रकारचे विषारी, बिनविषारी सापांची नोंद मध्यंतरी करण्यात आली होती. शेकरू अर्थात मोठी खार भीमाशंकर व फणसाडमध्ये आढळते.
पर्यटक, निसर्गप्रेमींसाठी सुविधा
फणसाडमधील भोमाचा माळ, गुण्याचा माळ, भांडव्याचा, माळ चाकाचा माळ असे हिरव्यागार गवताची चादर असलेले माळरान तसेच बारमाही पाण्याचे स्रोत आहेत. याठिकाणी असलेले मचाणीवर बसल्यास विविध जंगली श्वापदांचे दर्शन घडते. अभयारण्यात फायबर लेपॉर्डचे दोन वातानुकूलित टेंट आहेत. तर, व्हाईट हाऊसमध्ये आठ बेड व्यवस्था आहे. पर्यटकांसह पशु-पक्षी निरीक्षकांसाठी चांगली सुविधा उपलब्ध असल्याने गेल्या काही वर्षांत अभयारण्यात भेट देणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
फणसाड बचत गटातर्फे अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी शाकाहारी-मांसाहारी भोजनाची व्यवस्था करण्यात येते. या ठिकाणी बैलगाडी सफरीचा आनंद बच्चे कंपनीला घेता येतो. वन्यजीव तसेच जैवविविधतेच्या निरीक्षणासाठी प्रौढास ६० रुपये तर १२ वर्षांखालील मुलांसाठी ३० रुपये शुल्क आकारले जाते. वीकेण्ड अथवा सुटीच्या दिवशी १०० ते १५० पर्यटक भेट देतात. ऑक्टोबरपासून आतापर्यंत ४५० पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे.
- नारायण राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, फणसाड
..................
आल्हाददायी वातावरणामुळे पर्यटनाला चालना
पाली (वार्ताहर) ः गर्द हिरवी झाडी, विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि सह्याद्रीच्या लांब रांगा अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या रायगड जिल्ह्यात थंडीची सुरुवात होत आहे. पहाटे सर्वत्र दाट धुके पसरलेले दिसते. सकाळ-सायंकाळी गारवा वाढला असून अशा आल्हाददायक वातावरणाचा पर्यटक व प्रवासी मनसोक्त आनंद घेत आहेत. परतीचा पाऊस यंदा ऑक्टोबरपर्यंत रेंगाळल्याने वातावरणात उष्मा वाढला होता; मात्र सध्या थंडीची चाहूल लागली असून पहाटे जिल्ह्यात धुक्याची दुलई पसरलेली दिसते. सध्या तापमानाचा पारा घसरला असून किमान २३ ते २५ अंश सेल्सिअस तर तर कमाल ३१ ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत नोंद होत आहे. ट्रॅकिंग व पर्यटनासाठी हे वातावरण उत्तम असल्याने भटकंती करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातून मुंबई-गोवा तसेच मुंबई-बंगळूर, मुंबई-पुणे असे महामार्ग जातात. दाट धुक्यामुळे सकाळच्या वेळी वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

