आंबोली तीर कालव्याचे रखडलेले काम अखेर 10 वर्षांनंतर सुरु धरणातील प्रचंड पाणी साठ्यामुळे उन्हाळी भातशेती शक्य !

आंबोली तीर कालव्याचे रखडलेले  काम अखेर  10 वर्षांनंतर सुरु   धरणातील प्रचंड पाणी साठ्यामुळे  उन्हाळी  भातशेती शक्य !
Published on

१० वर्षांची प्रतीक्षा अखेर समाप्त
आंबोली तीर कालव्याच्या कामाला सुरुवात
मुरूड, ता. १५ ( बातमीदार) : आंबोली धरण लघु पाटबंधारे प्रकल्पांतर्गत उजवा तीर कालवा व डावा तीर कालव्याच्या १० वर्षांपासून रखडलेल्या कामास अखेर सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पुढील खरीप हंगामानंतर उन्हाळी भातशेती शक्य झाल्यास भात उत्पादन क्षेत्र वाढीस लागणार आहे.
मुरूड शहरालगत १० कि.मी. परिसरात अन्यत्र धरण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जिरायत शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. धरण क्षेत्रात प्रचंड जलसाठा असूनही कालव्याअभावी दुपिकी पिकांपासून विशेषतः उन्हाळी भातपिकापासून शेतकरीवर्ग वंचित आहे. मुरूड तालुक्यात जमीनधारणा काही गुंठ्यांमध्ये असल्याने विहीर काढणे अल्प भूधारकांना शक्य होत नाही. म्हणून पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आंबोली कालव्यांचे रखडलेले काम पूर्ण झाल्यास सहाशे हेक्टरहून अधिक जमीन दुपिकी होणार असून, उन्हाळी भातशेतीसह फळफळावळ, भाजीपाला तसेच दुग्ध व्यवसायासारखे पूरक उद्योग शेतकऱ्यांना करणे शक्य होऊन त्यांच्या आर्थिक स्थितीत बदल होणार आहे.

दुबार भातशेतीसाठी आशा पल्लवित
आंबोली उजवा तीर कालव्याची लांबी ७.१० कि.मी. तर डाव्या तीर कालव्याची लांबी २.६४ कि.मी. इतकी असून, आतापर्यंत दोन्ही तीर कालव्यांचे काम एक कि.मी.पेक्षा पुढे न सरकल्याने धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना केवळ आशा लागून राहिली आहे. आंबोली धरणाचे काम सन २००९ मध्ये सुरू झाले. मुरूड तालुक्यांतील या महाकाय धरणामुळे मुरूड शहरासह सुमारे १२ गावांतील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. या पर्यटनस्थळी तरलत्या लोकसंख्येला (floting population) या धरणाची विशेष मदत असून, या धरण परिसरातील तिसले, जोसरांजण, उंडरगाव, वाणदे, शीघ्रे, नवीवाडी या ग्रामस्थांची १७ एकर जमीन अधिग्रहीत केली आहे. मुरूड तालुक्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय भातशेती आहे, परंतु येथे दुपिकी क्षेत्र अजिबात नाही. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास बऱ्यापैकी दुबार भातशेती होईल, अशी ग्रामस्थांची धारणा आहे.

रब्बीत पाण्याचा अभाव
मुरूड तालुक्यामध्ये रब्बी हंगामामध्ये पाण्याची उपलब्धता कमी असल्याने उन्हाळी भाताचे पीक शेतकरी घेऊ शकत नाहीत. कारण भातपिकाला पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते आणि रब्बी हंगामामध्ये मुरूड तालुक्यामध्ये पाण्याची कमतरता भासत असल्यामुळे उन्हाळी भाताचे पीक घेणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांना कालव्यासाठी वापरात येणाऱ्या भूसंपादन केलेल्या जागेचा अधिकचा मोबदला मिळेल, अशा अपेक्षेत शेतकरीवर्ग आहे, पण शासनाकडून याबाबतीत कुठलाही मोबदला मिळणार नाही, असे पाटबंधारे विभागाकडून कळल्याचे समजते. बंदिस्त कालवा ज्या शेतजमिनीतून जाणार आहे, ती जागा पाच फूट खोल खणण्यात येणार असून, शेतकऱ्यांचे काहीही नुकसान होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. यदाकदाचित शासकीय कामात अडथळा निर्माण केला, तर पोलिस यंत्रणेला पाचारण करून कालव्याचे काम पूर्ण करणार, अशी माहिती मिळत आहे.

कालव्यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल
कालव्याचे काम पूर्ण झाल्यास कृषी पर्यटनास व्यवसाय तसेच फळफळावळ, भाजीपाला आदींचे उत्पन्न वाढेल आणि बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. शासकीय लालफितीत रखडलेला कालव्याचा प्रकल्प मार्गी लागल्यास बेरोजगार स्थानिक युवक शेतीकडे वळतील आणि रोजीरोटीचा अशंतः प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

पुढील हंगामात रब्बीत पाणीपुरवठा शक्य
यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अभियंता अरुण रोकडे यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता ते म्हणाले की, "या आंबोली तीर कालव्याला दि. २८.१०.२००५ मध्ये प्रथम प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तसेच आता नवीन जलसिंचन धोरणानुसार उघड्या कालव्याऐवजी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली याद्वारे शेतीसाठी पाणी द्यावे, असे आहे. नवीन सिंचन धोरणामुळे आंबोली प्रकल्पास दि. १३.१२.२०२२ रोजी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे आणि बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे संकल्पन प्राप्त झाल्यामुळे निविदा कार्यवाही पूर्ण होऊन आंबोली प्रकल्प लाभक्षेत्र या ठिकाणी जलसिंचन पाइपलाइन टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे. काम पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे पुढील हंगामापासून रब्बी-उन्हाळी शेतीकरिता पाणी उपलब्ध होईल."
धरणाचे काम सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणामुळे नुकसानभरपाई मिळेल, या अपेक्षेने बंदिस्त पाइपलाइन बंद पाडण्याचा प्रयत्न होऊ शकतो.


सोबत - फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com