भातपेरणी फुकट जाण्याचा धोका
भातपेरणी फुकट जाण्याचा धोका
मुरूड तालुक्यात पावसाचा जोर कायम; बळीराजा धास्तावला
मुरूड, ता. १८ (बातमीदार) ः गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला लवकर सुरुवात झाल्याने पेरणी वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत. महागडे बियाणे खरेदी करून अनेकांनी भाताची पेरणी केली; मात्र असली तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे कोवळी रोपे पाण्याखाली गेल्याने भातपेरणी फुकट जाण्याची चिंता बळीराजाला सतावत आहे.
जमिनीत ओलावा राहिल्याने रोपांच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला असू उगवलेली रोपे कमकुवत झाल्याचे दिसते. पाऊस असाच सुरू राहिला तर बियाणे कुजून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा लागवडपूर्व मशागतीला वेळ न मिळाल्याने शेतकऱ्यांची खूप धावपळ झाली. नांगरणीलाही पुरेसा वेळ मिळाला नाही. बहुतांश शेतकरी अल्प भूधारणा असल्याने नांगरणी खर्च व मजुरी परवडत नसल्यामुळे भातशेती ओस ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. मुरूड तालुक्यात एकूण भातक्षेत्र ३,२०० हेक्टर असले तरी यंदा भातलागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रायगड जिल्हा हे भाताचे कोठार म्हणून ओळखले जात असे; परंतु वाढत्या औद्योगिकीकरणामुळे भातलागवड क्षेत्र कमी होत आहे. दक्षिण रायगडासह अलिबाग, मुरूड तालुक्यात आजही पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते; मात्र पावसामुळे काही ठिकाणी खरीप हंगामातील भातपेरणी अद्याप सुरूच झालेली नाही. धूळपेरणीचा पर्याय असला तरी ती भर पावसात कशी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एरवी मृग नक्षत्रामध्ये पेरणी होते; परंतु यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातल्याने पेरणी लांबणीवर पडली.
शेतकऱ्यांना खरीप हंगामातील धूळवाफे पेरणी करता आली नसल्याने मुरूड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. धूळपेरणीसाठी महत्त्वाचे म्हणजे ऊब तथा वापसा तयार होण्यासाठी उन्हाची आवश्यकता आहे; परंतु पावसामुळे जमिनीत भरपूर प्रमाणावर लागणारी ऊब निर्माण होणे कठीण वाटते. उगवणी पद्धत खर्चिक असून तीन दाणे पेरले तर एक उगवते. या पद्धतीत भात भिजत घालून मोड आल्यावर लागवड करायची; मात्र ही पद्धतीही आता अवघड वाटत असल्याने शेती ओस पडण्याची शक्यता आहे.
रोपे कुजण्याची भीती
आठ दिवसांपूर्वी भाताची पेरणी केली असून पुरेसा वापसा न मिळाल्याने रोपांची एक ते दोन इंच अशी पातळ उगवण झाली आहे; मात्र असाच जोरदार पाऊस सुरू राहिला तर रोपांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच पिकाचा दर्जाही खालवण्याची शक्यता वाणदे येथील शेतकरी तुकाराम पाटील यांनी वर्तवली.
बोनसची प्रतीक्षा
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागातर्फे विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना सात-आठ वर्षांपासून भाताला हमीभाव दिला जातो. रायगड जिल्ह्यात ३५ हून अधिक भात खरेदी केंद्र कार्यरत आहेत; मात्र दरवर्षी एप्रिलअखेर मिळणाऱ्या बोनसची रक्कम अद्याप न मिळाल्याने तसेच पेरणीही खर्चिक होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गतवर्षी सरकारने भात उत्पादकांना प्रती हेक्टरी २० हजार बोनस दिला होता. यंदा प्रती हेक्टरी २५ हजार रुपये बोनस जाहीर केला असला तरी अद्याप मिळालेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.