पावसाळ्यात कोळीबांधवांना रापणाचा आधार
पावसाळ्यात कोळीबांधवांना रापणचा आधार
यंदा मेपासून मासेमारीवर बंदी; शासनाकडून मदतीची अपेक्षा
मुरूड, ता. ५ (बातमीदार) ः पावसाळ्यातील तीन महिने मच्छीमारांना समुद्रातील खोल मासेमारी करण्यास बंदी घालण्यात येते. शिवाय, यंदा मेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे यंदा मच्छीमारांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. त्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी मच्छीमारांना सध्या रापणचा आधार घ्यावा लागत आहे.
सततचा वादळी पाऊस, हवामानात होणारे अचानक बदल आणि एलईडी, पर्सनेट बोटींची अनधिकृत मासेमारी, यामुळे स्थानिक कोळीबांधवांना खोल समुद्रात जाऊनदेखील माशांची टंचाई जाणवू लागली आहे. शिवाय, शासनातर्फे १ मे ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कुटुबांच्या उपजीविकेसाठी कोळीबांधवांना सध्या रापणचा आधार घ्यावा लागत आहे. पहाटे चार ते पाच वाजल्यापासून सुरू झालेले रापण दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहते. एक जाळी पकडण्यासाठी १५ ते २० तरुण मच्छीमारबांधव लागतात. दुपारपर्यंत रापण करून जे मासे मिळतात ते विकून आपला वाटा घेऊन घरी यायचे, असा दिनक्रम या दोन महिन्यांत सुरू राहतो; मात्र जे शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहेत ते गवंडी किंवा पेंटींग कामाला लागतात, अशी प्रतिक्रिया प्रकाश सरपाटील यांनी दिली. शासनाने अलीकडेच मत्स्यव्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मत्स्य प्रजनन काळात दोन महिने कोळीबांधवांच्या हाताला कोणतेही काम नसते. या कालावधीत कुटुंबाचा खर्च, औषधे यासाठी आर्थिक बेगमी नसते. त्यामुळे या नवीन शासन निर्णयाचा अंशतः लाभ मासेमारी करणाऱ्यांना मिळेल, अशी अपेक्षा रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी केली आहे.
.........
कोळीबांधावांचा कष्टाचा खेळ
रापणचे जाळे मोठे असते. ते पाण्यातील मोठा भाग व्यापते. या जाळ्याला दोन्ही बाजूंना ५० ते ६० जाड काथ्यांचा दोरखंड, ५० ते ६० पाटे जोडून, १५ फूट उंची राखली जाते. मधील घोळाच्या भागाला पाटे मजबूत लावले जातात. जाळ्याच्या सुरुवातीला व दोरखंडाच्या शेवटी १५ फूट उंचीचा मजबूत उंडलीचा दांडका लावलेला असतो. रापण ओढणे हे सोपे नसते. त्याला दमदार व भक्कमपणे खेचावे लागते. दोरखंड ओढताना कोळीबांधवांना पाय वाळूत खोलवर रोवून ठेवावे लागते. त्यानंतर जाळे किनारी आल्यावर मासे नसल्यास पुन्हा कष्टाचा खेळ सुरू राहतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.