युनेस्‍कोकडून पद्मदुर्ग किल्ल्याकडे दुलर्क्ष

युनेस्‍कोकडून पद्मदुर्ग किल्ल्याकडे दुलर्क्ष

Published on

पद्मदुर्ग किल्ल्याकडे शासनाचे दुर्लक्ष
मुरूड, ता. १५ (बातमीदार) ः नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मुरूडमधील पद्मदुर्ग किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने शिवप्रेमींकडून नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. शासनाचे या किल्ल्याच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्‍थिती ओढावली, असे बोलले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र ऐतिहासिक जंजिरा किल्ला काबीज करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांनी खोल अरबी समुद्रात पद्मदुर्ग ऊर्फ कासा किल्ल्याची उभारणी केली. संपूर्ण कोकण पट्टीवर हबशांना महाराजांनी जंजिऱ्यावरच जखडून ठेवले होते. त्‍यासाठी पद्मदुर्ग किल्ल्याची मोठी मदत झाली. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत न झाल्याने शिवप्रेमींसह मुरूड तालुक्यातील नागरिकांनी नाराजी दर्शविली आहे. पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आशीलकुमार ठाकूर यांनी सांगितले, की पद्मदुर्ग किल्ल्याची उपेक्षाच झाली आहे. किल्ल्याच्या डागडुजी, संवर्धनासाठी निधी उपलब्ध झाला नसल्याची खंत त्‍यांनी बोलून दाखविली. लोकप्रतिनिधींनी या किल्ल्याकडे लक्ष दिले असते तर आज युनेस्‍कोच्या यादीत समावेश झाला असता.

Marathi News Esakal
www.esakal.com