मुरूडमध्ये भातलावणी अंतिम टप्प्यात!
मुरूडमध्ये भातलावणी अंतिम टप्प्यात
तालुक्यात ८० टक्के काम पूर्ण
मुरूड, ता. १७ (बातमीदार) ः मुरूड तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भातलावणी अंतिम टप्प्यात आली आहे. दमदार पावसामुळे खारपट्ट्यात तसेच सखल भागातील शेती लावण्यात शेतकरी व्यग्र दिसून येत आहे. तालुक्यात ८० टक्के भातलावणीचे काम पूर्ण झाले असून आठवडाभरात उर्वरित लागवड पूर्ण होईल, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
यंदा मेमध्येच अवकाळीने जोरदार हजेरी लावली. ८२९ मि.मी. इतक्या मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे भात पेरणीचे तंत्रच विस्कटून गेल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. जमिनीतील वापसा अचानक पडलेल्या पावसामुळे निघून गेल्याने राब कसे तयार होतील, या चिंतेने बळीराजा त्रस्त झाला होता; मात्र निसर्गाच्या कृपेमुळे कधी ऊन तर कधी पाऊस कोसळल्याने राब फुकट गेले नसल्याने शेतकऱ्यांना लाभ झाला, अन्यथा रऊ पद्धतीचा वापर करण्याखेरीज पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांतून सांगण्यात आले. भातलावणीच्या कामात दरवर्षीप्रमाणे यंदा ही मजुरांची टंचाई भासत आहे; परंतु शेती करणे गरजेचे असल्याने अनेकांनी अशा कठीण परिस्थितीमध्ये माघार घेतली नाही. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड झाली आहे. खरीप हंगामातील भात हे एकमेव पीक असल्यामुळे लावणीसाठी रोजंदारीवर मनुष्यबळ शेतात राबताना दिसून येत आहेत.
......................
३,२०० हेक्टर क्षेत्रावर लागवड
१ जूनपर्यंत ६७८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. गतवर्षी हे प्रमाण १,६६२ मि.मी. होती. यंदा मेमधील पर्जन्य लक्षात घेता, पावसाने सरासरी गाठल्याचे चित्र आहे.
मुरूड तालुक्यात भातलागवड क्षेत्र ३,२०० हेक्टर आहे. यामध्ये अत्यल्प भूधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. भाताच्या विविध वाणांमध्ये सुवर्णा, जया, वाडा कोलम, रूपाली, चिंटू, श्री, शुभांगी, सारथी, कोमल, जोरदार आदी प्रकार उपलब्ध असले तरी येथील शेतकरी उतारा मिळावा, यासाठी बहुधा सुवर्णा, जया, वाडा कोलम, चिंटू या वाणांना अधिक प्राधान्य देत आहेत. अशी पारंपरिक पद्धतीने अर्थात बैलजोड घेऊन चिखलणी, नांगरणी करून भातलागवड केली जात आहे. कुठे आधुनिक यंत्राचा वापर करण्यात येत आहे तर काही ठिकाणी भातलागवडीसाठी सगुणा पद्धतीचा वापर करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.