म्हसळ्यात महायुतीत तणाव

म्हसळ्यात महायुतीत तणाव

Published on

म्हसळ्यात महायुतीत तणाव
शिवसेना प्रवेश रॅलीला राष्ट्रवादीचे काळे झेंडे
म्हसळा, ता. २७ (बातमीदार) : म्हसळा नगरपंचायत क्षेत्रात घडलेल्या अलीकडील राजकीय घडामोडींमुळे महायुतीत अंतर्गत तणाव निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा फरहीन बशारथ यांच्यासह आठ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
या प्रवेशानंतर अवघ्या दोन दिवसांत खासदार सुनील तटकरे यांनी राजकीय प्रतिआक्रमण करत शिवसेनेच्या तालुका प्रमुखासह महिला आघाडी, विभाग प्रमुख आणि शहरप्रमुखांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले. त्यामुळे म्हसळा तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले. दरम्यान, राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नगराध्यक्षा आणि नगरसेवकांच्या स्वागतासाठी पेट्रोल पंप ते नगरपंचायत कार्यालयापर्यंत भव्य स्वागत रॅली काढण्यात आली. या रॅलीला मंत्री भरत गोगावले प्रमुख उपस्थित होते. मात्र रॅली नगरपंचायत कार्यालयासमोर पोहोचताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी केल्याने बाजारपेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हसळा पोलिस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी स्वतः नगरपंचायत कार्यालयात जाऊन नगराध्यक्षा फरहीन बशारथ यांना त्यांच्या आसनावर बसवत पदभार स्वीकारण्यास मार्गदर्शन केले. उपस्थितांना संबोधित करताना गोगावले म्हणाले की, म्हसळा शहराच्या विकासाची जबाबदारी आता आमच्यावर आली आहे. पुढील काळात विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही. तसेच त्यांनी लवकरच म्हसळा तालुक्यातील आणखी काही गावांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचेही जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com