छेडछाडीवरून वाद; तरुणीने गमावला हात

छेडछाडीवरून वाद; तरुणीने गमावला हात
Published on: 

छेडछाडीवरून वाद; तरुणीने गमावला हात
भाईंदर रेल्वे स्थानकात रुळावर पडून जखमी

भाईंदर, ता. १२ (बातमीदार) : छेडछाड केल्याच्या आरोपावरून लोकलमध्ये सुरू झालेल्या भांडणानंतर आरोपीने तरुणीला रेल्वे रुळांवर ढकलल्याने तिला आपला हात गमवावा लागल्याची घटना नायगाव रेल्वे स्थानकात ४ नोव्हेंबरला घडली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
बोरिवलीहून विरारला जात असलेल्या लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे एक वीसवर्षीय तरुणी महिलांच्या डब्यात न चढता जनरल डब्यात चढली. प्रवासादरम्यान एक व्यक्ती तिच्यासोबत छेडछाड करत असल्याचे पाहून तिने जाब विचारला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. दोघेही नायगावला राहणारे होते. त्यामुळे स्थानकात उतरल्यानंतरही त्यांच्यात वाद झाला. या वादात त्या व्यक्तीने तरुणीला धक्का दिला व ती दोन डब्यांच्या मधील मोकळ्या जागेतून खाली रुळावर पडली. ती वर येण्याच्या प्रयत्नात असतानाच लोकल सुरू झाली व त्यात तिचा डावा हात कोपरापासून अक्षरशः चिरडला गेला. लोकल पुढे गेल्यानंतर अन्य प्रवाशांनी तरुणीला फलाटावर घेतले. आधी वसई व नंतर तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यानच्या काळात धक्का देणारी व्यक्ती स्थानकातून पळून गेली होती. उपचारादरम्यान डॉक्टरांना तरुणीचा डावा हात कोपऱ्यापासून कापावा लागला. याप्रकरणी भाईंदर रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्हीद्वारे आरोपीची ओळख पटवली. त्याचे नाव जितेंद्र हिरमुखे असे असून, त्याला ९ नोव्हेंबरला नायगाव येथील त्याच्या घरातून अटक करण्यात आली.