माथेरानमध्ये ई-रिक्षाचा प्रवास खडतर

माथेरानमध्ये ई-रिक्षाचा प्रवास खडतर

Published on

माथेरानमध्ये ई-रिक्षाचा प्रवास खडतर
पर्यटकांच्या दृष्टीने संख्या कमी; उपाययोजना करण्याची गरज
माथेरान, ता. १५ (बातमीदार) ः माथेरानमध्ये ई-रिक्षाचा प्रवास दिवसेंदिवस खडतर होत चालला आहे. पर्यटकांच्या दृष्टीने संख्या कमी असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्‍यातच नैसर्गिक आपत्तीसह विविध कारणांनी काही ई-रिक्षा बंद असल्याने स्‍थानिकांसह पर्यटकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्‍यामुळे प्रशासनाने या ई-रिक्षांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमध्ये शासनाच्या वतीने सुरू असलेल्या पायलेट प्रोजेक्टमध्ये पहिल्या टप्प्यात २० ई-रिक्षा धावू लागल्या. सध्या या रिक्षा शाळा, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच पर्यटकांना सेवा देत आहेत. या २० ई-रिक्षांपैकी १५ शालेय विद्यार्थ्यांना आणि राहिलेल्या पाच रिक्षा या आजारी रुग्ण, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्थानिक आणि पर्यटकांसाठी राखीव आहेत. त्यातील काही रिक्षा नादुरुस्त असल्याने त्‍या बंद आहेत, तर मागील काही दिवसांत तीन रिक्षांवर झाड पडून मोठे नुकसान झाले आहे. त्‍यामुळे अनेक अडचणींचा सामना करून रिक्षाचालकांना सेवा द्यावी लागत असल्याचे श्रमिक हातरिक्षा चालक-मालक सेवा संघाचे म्हणणे आहे. येथील अनेक ठिकाणी अर्धा रस्ता जांभा दगडाचा आणि अर्धा रस्ता क्ले-पेव्हर ब्लॉकचा असल्याने रिक्षाचालकाला चढावरून गाडी चढविताना कसरत करावी लागते. त्‍यातच जांभा दगडाचा रस्ता अतिशय खराब झाल्याने खड्डे पडले असून, गाडी पळवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे ई-रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------
रस्ता सुरळीत करण्याची गरज
ज्या ठिकाणी ई-रिक्षांवर झाड पडून दुर्घटना घडली त्या काळोखीच्या वळणावर क्ले-पेव्हर ब्लॉक आणि जांभा दगड असे दोन भाग आहेत. त्यावर घोडे चालून जांभा दगडाची झीज झाल्याने रस्ता ओबडधोबड झाला आहे. तिथे घोडा आणि ई-रिक्षा चालवणे जिकिरीचे झाले असून, हा रस्ता नियोजनबद्ध करण्याची गरज आहे. जोरदार पावसामुळे जमिनीची धूप होऊन दगड गोटे हे लाल मातीच्या रस्त्यावर येतात. परिणामी रिक्षाचे पाटे तुटण्याचे प्रकार वाढत आहेत.
-------------------------------------------------------------------
जून २०२४ पासून हा ई-रिक्षा पायलट प्रोजेक्ट सुरू झाला. यामध्ये २० रिक्षा सुरू केल्या. त्यावेळेस शालेय विद्यार्थ्यांची संख्या ११० होती. त्‍यामुळे १५ रिक्षा ११० विद्यार्थ्यांसाठी सुरळीत होत्या, मात्र यावर्षी जूनपासून तीन शाळांचे मिळून २८३ विद्यार्थी या सेवेचा लाभ घेत आहेत. त्यात नैसर्गिक आपत्तीत तीन रिक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. माथेरान नगरपालिकेने या पायलट प्रोजेक्‍टसाठी सात रिक्षा खरेदी केलेल्या असून, त्या कम्युनिटी सेंटर येथे बंद अवस्थेत आहेत. श्रमिक हातरिक्षा संघटनेच्या रिक्षा दुरुस्तीसाठी बंद ठेवल्या आहेत. त्‍यामुळे या रिक्षा आमच्याकडे चालविण्यास दिल्यास विद्यार्थ्यांसह सर्वांना सेवा देणे शक्य होईल.
-सुनील शिंदे, सचिव, श्रमीक हातरिक्षा चालक-मालक सेवा संघटना
--------------------------------------------------------------------
माथेरान आवडते पर्यटनस्थळ असल्याने आम्ही येथे दरवर्षी येतो. सोशल मीडियामधून येथे रिक्षा सुरू झाल्याचे समजले. त्यामुळे चांगली सुविधा मिळेल, अशी आशा होती, पण ई-रिक्षांची संख्या कमी आहे. मी दीड तासापासून रांगेत उभा आहे. खूप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने रिक्षांची संख्या वाढवली पाहिजे.
-सुनील ठाकूर, पर्यटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com