माथेरान घाटमार्गावर पर्यटकांची पायपीट
माथेरान, ता. २१ (बातमीदार) ः पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी रविवारी माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांना परतीच्या प्रवासासाठी वाहनच उपलब्ध न झाल्याने त्यांचा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. नेरळ-माथेरान टॅक्सीचालक-मालक संस्थेने सेवा बंद केल्याने पर्यटकांना नऊ किलोमीटर अंतर पायपीट करावी लागली. यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींचे हाल झाल्याने पर्यटकांनी संताप व्यक्त केला.
सध्या माथेरानमध्ये पावसाळी पर्यटन तेजीत जात आहे. वीकेण्ड असल्याने शनिवार, रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मौज-मजा केल्यावर रविवारी जेव्हा पर्यटक परतीच्या प्रवासाला निघाले तेव्हा त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. टॅक्सीसाठी पर्यटकांची रांग लावण्यात आली. ७०० मीटरपर्यंत लांब रांग गेली होती. नेरळ पोलिसांनी धडक कारवाई सुरू केल्याने अनेक टॅक्सी पोलिस ठाण्यासमोर उभ्या करण्यात आल्या होत्या. ज्यांच्या गाड्यांची कागदपत्रे अपूर्ण होती, गणवेश नसलेल्या चालकांनी वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात उभी करण्यात आली होती. वीकेण्डला, ऐन पर्यटन हंगामात पोलिसांनी कारवाई केल्याने काही वेळासाठी टॅक्सीचालक-मालक तसेच पोलिसांमध्ये वादही निर्माण झाला होता.
पर्यटक नेरळ रेल्वेस्थानकाकडे पायी निघाल्याने उताराच्या रस्त्याला जत्रेचे स्वरूप आले होते. हातात आणि खांद्यावर सामानाची बॅग, एक हाताचे बोट धरून चालणारे लहान मुले, चेहऱ्यावर तणाव असे चित्र रविवारी दिसत होते. माथेरानपासून दोन किलोमीटर चालल्यानंतर संस्थेच्या गाड्या माथेरानकडे येऊ लागल्या, मात्र त्यांची संख्या अपुरी असल्याने रात्री उशिरापर्यंत पर्यटक घाटरस्त्यावरून मार्गक्रमण होताना दिसले, तर काही टॅक्सी दस्तुरीपर्यंत न येता घाटातूनच पर्यटकांना नेरळकडे घेऊन जात होत्या.
पोलिस कारवाईचा फटका पर्यटकांना
रविवारी माथेरान पर्यटकांनी बहरले होते. सहलीचा आनंद घेऊन परतीच्या मार्गावर असताना अचानक प्रवासी वाहने बंद झालीत. याबाबत पर्यटकांना काहीच कल्पना नसल्याने काही वेळ संभ्रम निर्माण झाला. पोलिसांकडून वाहनांवर कारवाई करण्यात आल्याने टॅक्सी बंद असल्याचे कळल्यावर अनेक पर्यटक पायी नेरळ स्थानकाकडे निघाले. वीकेण्डला मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात, हे माहीत असूनही पोलिसांनी कारवाई केल्याने टॅक्सीचालक-मालक संघटनेने आक्रमक भूमिका घेत वाहने बंद केली. त्यामुळे पर्यटकांचे हाल झाले.
माथेरान फिरण्यासाठी आलो होते, येथील वेगवेगळे पॉइंट, निसर्गसौंदर्य भुरळ पाडणारे आहेत, मात्र वाहन सुविधा नसल्याने पर्यटकांना विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना त्रास झाला. टॅक्सी बंद असल्याने चालत यावे लागले. प्रशासनाने पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
- भाग्यश्री साळुंखे, पर्यटक
बहुतांश स्थानिकांचा उदरनिर्वाह पर्यटक व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना चांगली सेवा देणे आपले कर्तव्य आहे. काही लोक पर्यटकांना वेठीस धरतात, हे चुकीचे आहे. त्यामुळे माथेरानविषयी चुकीचा संदेश पसरतो. प्रशासनानेही चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करावेत.
- दिनेश सुतार, माजी नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.