माथेरानमधील पशूधन संकटात

माथेरानमधील पशूधन संकटात

Published on

माथेरानमधील पशूधन संकटात
तज्ज्ञांअभावी रुग्णालयाची दुर्दशा, प्रशासनाचे दुर्लक्ष
माथेरान ता.१४ (बातमीदार)ः पर्यटन नगरी असलेल्या माथेरानमध्ये जिल्हापरिषदेचा श्रेणी एकचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. पण या दवाखान्यात प्रभारी डॉक्टर, परिचारक नसल्यामुळे प्रवासी वाहकासह मालवाहतूक करणारे अश्व, पाळीव प्राण्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कर्जत तालुक्यातील पशुधनापेक्षा माथेरानमध्ये सर्वाधिक पशुधन आहे. पर्यटकांच्या सेवेसाठी ४६० प्रवासी घोडे आहेत. याचबरोबर माथेरानमध्ये मालवाहतूक करणारे घोडे, बकऱ्या, कोंबडे, कुत्रे, गाय, म्हशी अशा प्रकारचे विविध पाळीव पशुधन देखील आहे. याचबरोबर परिसरातील वन्यजीवासांठी देखील याच दवाखान्यात उपचार मिळत होते. पण जून २०२५ नंतर या दवाखान्यात प्रभारी डॉक्टरची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्याचा फटका अश्वपालकांना बसत आहे. उपचारातील दिरंगाईमुळे एक घोडा दगावला असल्याने अश्वपालकावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच चार महिन्यापासून दवाखाना बंद असल्याने अस्वच्छता, दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे सुविधा असून गैरसोईची तक्रार स्थानिकांमध्ये आहे.
----------------------------------------------
आमच्यासाठी उदरनिर्वाहाचे घोडे हेच साधन आहे. पण चार महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत. यापूर्वी शिबिरांमधून उपचार केले जात होते. पण आता ते देखील होत नसल्याने अश्वपालकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
- आशा कदम, अध्यक्षा, अश्वपाल संघटना

Marathi News Esakal
www.esakal.com