रोषणाईच्या साक्षीने नव वर्षाचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोषणाईच्या साक्षीने नव वर्षाचे स्वागत
रोषणाईच्या साक्षीने नव वर्षाचे स्वागत

रोषणाईच्या साक्षीने नव वर्षाचे स्वागत

sakal_logo
By

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे नवी मुंबईकरांनी जल्लोषात स्वागत केले. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच नववर्ष स्वागताचा हा जोश आणि आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. नवी मुंबईतही दरवर्षीप्रमाणे यंदाही नवी मुंबई महापालिका मुख्यालयाबाहेर हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. या वेळी मुख्यालयासमोरील विद्युत रोषणाईने नवी मुंबईकरांसह उरण, पनवेलच्या नागरिकांनादेखील भुरळ घातली होती.
हिरव्यागार खाडीकिनारी उभी असलेली नवी मुंबई पालिकेची पांढरी शुभ्र वास्तू नेहमीच अनेकांचे लक्ष वेधून घेते. अशातच गेली दोन वर्षे असलेल्या कोविडच्या संकटातून बाहेर पडण्यात नवी मुंबईकरांना यश आले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या अथक प्रयत्नांमुळे या रोगाचा संसर्ग कमी करण्यात यश आले आहे. त्यामुळे नागरिकांनादेखील यंदा नववर्षाच्या स्वागतासाठीच जय्यत तयारी केली होती. नवी मुंबईकरांच्या या उत्साहाला महापालिकेच्या मुख्यालयावरील विद्युतरोषणाईमुळे अधिक प्रोत्साहन मिळाले आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी नवी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील बघ्यांची मोठी रीघच पालिका मुख्यालयासमोर लागली होती. सायंकाळी ६ वाजल्यापासून अगदी पहाटेपर्यंत उपस्थित असलेल्यांचा उत्साह बघण्यासारखा होता. या वेळी आकर्षक प्रकाशयोजनेचा प्रत्येक क्षण टिपण्याची चढाओढच लागली होती; तर सेल्फी विथ नवी मुंबई पालिका घेण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. या वेळी पालिकेसमोर असलेल्या हिरव्यागार लॉनवर बसून विद्युत रोषणाईचे फोटो मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करताना शहराचा अभिमान असलेली ही वास्तू अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
-------------------------------
आतषबाजी नसल्याने अनेकांचा हिरमोड
इन्स्टाग्रामवर रील्स बनवण्याची क्रेझ वाढली असल्याने प्रत्येक जण ही रोषणाई रील्समध्ये येईल यासाठी धडपड होता; तर काहींनी गाडीवर बसून फोटो शूट करून त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची चढाओढ लागली होती. या वेळी मनपा मुख्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी होईल या आशेने अनेकांनी गर्दी केली होती, पण यंदा ती झाली नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता.