चारापाण्यासाठी भटकंती सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारापाण्यासाठी भटकंती सुरू
चारापाण्यासाठी भटकंती सुरू

चारापाण्यासाठी भटकंती सुरू

sakal_logo
By

महेंद्र पवार : सकाळ वृत्तसेवा
कासा, ता. ३ : डिसेंबर महिना सुरू झाल्‍यावर अनेक मेंढपाळ ठाणे, पालघर जिल्ह्यात येत असतात. सध्या अनेक मेंढपाळ मेंढ्यांना सोबत घेऊन पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भटकंती करीत आहेत. गावाकडे दुष्काळी परिस्थिती असल्याने पाण्याची, हिरव्या चाऱ्याची तेथे कमतरता भासते. यामुळे दरवर्षी मेंढपाळ या भागात येऊन अनेक महिने राहून मेंढ्यांसह कुटुंबांच्‍या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतात.
मेंढपाळ म्हणजे अक्षरश: काबाडकष्ट, उपासमार, हालअपेष्टा सहन करून कडक उन्हात, थंडीत उघड्यावर कुटुंब काफिल्याला घेऊन फिरणारी जमात. सध्या नगर, पुणे, सातारा भागातील मेंढपाळ मेंढ्या घेऊन डहाणू तालुक्यातील ग्रामीण परिसरातील कासा, वेती, वरोती या भागात आले असून येथील शेतकऱ्यांच्या शेतात मुक्‍काम करत आहेत. मेंढ्यासाठी हिरवा चारा व पोटभर पाणी मिळेल या आशेवर यांची भटकंती सुरू असते.
कुटुंबासह घराबाहेर
जेजुरी धनगरवाडी येथील किसनराव घुले पत्नी लक्ष्‍मीसह मुलगा, सून आदींसह घराबाहेर निघाले आहेत.
दरवर्षी ते या परिसरात येत असतात. पावसाला सुरुवात होण्यापूर्वी ते आपल्या घरी परततात. घुले परिवारासोबत १५० मेंढी, २० बकरे आहेत.
-------------------------
कोट -
आम्ही गेल्या दीड महिन्यांपासून ठाणे, पालघर या भागात आलो असून, येथे मिळणारा हिरवा चारा व मोठ्या प्रमाणात असलेल्या जंगलातील पाला तसेच मुबलक पाणी यामुळे मेंढ्यांच्या खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था होते. मे अखेरपर्यंत या परिसरात भटकंती करून पुन्हा माघारी परतणार आहोत.
-काळूराम घुले, मेंढपाळ.