नवीन वर्षाचे स्वागत देवदर्शनाने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन वर्षाचे स्वागत देवदर्शनाने
नवीन वर्षाचे स्वागत देवदर्शनाने

नवीन वर्षाचे स्वागत देवदर्शनाने

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : ‘थर्टी फर्स्ट’निमित्त शनिवारी जल्लोष केल्यानंतर आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईकरांनी शहरातील काही प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली होती. देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्याला नागरिकांनी पसंती दिल्याने आज सकाळपासूनच अनेक मंदिरांत लाखो भक्तांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात पहाटेपासूनच बाप्पाच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. नववर्ष आरोग्यदायी, आर्थिक भरभराटीचे आणि अपेक्षापूर्तीचे जावो, असे साकडे भक्तांनी देवाला घातले.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात काल मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांग लागली होती. गणेशाच्या आशीर्वादाने मुंबईकरांनी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली. सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानेही भाविकांची विशेष सोय केली होती. सिद्धिविनायक मंदिराच्या प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. ‘गणपती बाप्पा मोरया...’च्या गजराने सिद्धिविनायकाचा गाभारा भक्तांनी पूर्णपणे सजून गेला होता. कोरोना संसर्गामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच भाविकांनी मोठ्या संख्येने बाप्पाचे दर्शन घेतले.

सिद्धिविनायक न्यासातर्फे भक्तांसाठी वेगवेगळ्या रांगांची सोय केली गेली होती. महिला, मुले, पुरुष आणि एकाच कुटुंबांतील मंडळींसाठी स्वतंत्र रांग करण्यात आली होती. पहाटे दीड वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अविरत दर्शन सुरू ठेवण्यात आले होते. मुखदर्शनाबरोबरच महिला आणि पुरुषांची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर प्रशासनाबरोबरच पोलिस, मुंबई महापालिका, अग्निशमन दल आणि इतर सेवाभावी संस्थांच्या सेवेकऱ्यांनी सेवा बजावली.

आम्ही सकाळी सहा वाजता कुर्ल्याहून निघालो. भाविकांची गर्दी असणार याची कल्पना होती. त्यामुळे थोडे लवकरच निघालो. महिलांची विशेष रांग असल्याने पाऊण तासात दर्शन झाले. शिवाय पहिली आरतीही मिळाली. प्रशासनाकडून उत्तम सोय करण्यात आली होती, असे भाविक तेजल कांगणे यांनी सांगितले.

कोरोनानंतर नववर्षाच्या स्वागतानिमित्त सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्याची संधी मिळाल्याचा एक वेगळाच आनंद आहे. बाप्पा आमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार असा विश्वास आहे. नववर्षाचा पहिला दिवस आणि माझा वाढदिवस असा योग जुळून येत असल्याने त्याचाही एक वेगळा आनंद आहे, असे ठाण्यातील रहिवासी आदित्य राणे यांनी सांगितले.

चोख बंदोबस्त
माझी बहीण गौरवी भाटकर हिच्याबरोबर सकाळी आठ वाजता मंदिरात पोहोचलो. दरवर्षी मी बाप्पाच्या दर्शनाला येतो. सकाळी गर्दी होती; पण दर्शन व्यवस्थित झाले. मंदिरात पुरुषांच्या आणि महिलांच्या रांगा वेगवेगळ्या होत्या. धक्काबुक्की होऊन नये म्हणून पोलिस कर्मचारी अधिक संख्येने तैनात होते. बाप्पाचे मुखदर्शन नऊ वाजता झाले. नवीन वर्षाची सुरुवात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने करायची होती म्हणून पहाटे लवकर उठून दर्शन घेतले. गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर ते दादर स्थानकापर्यंत बेस्टची मोफत सेवा होती, असे विक्रोळीतील रहिवासी शैलेश चव्हाण यांनी सांगितले.