देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात
देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात

देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात

sakal_logo
By

ठाणे, ता. १ : मावळत्या सूर्यासोबत गतवर्षाला निरोप दिल्यानंतर नवी स्वप्ने आणि आशा-आकांक्षासह नववर्षाचा सूर्योदय झाला आहे. जगभरात २०२३ चे जल्लोषात स्वागत होत असताना ठाणे जिल्‍ह्यातील हजारो भाविकांनी देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात केली. पहाटेपासूनच टिटवाळा, डोंबिवलीच्या गणपती मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. तर बदलापूरच्या खंडोबा मंदिर, अंबरनाथच्या शिवमंदिरातही भाविकांची संख्या लक्षणीय होती. ठाणे, कल्याणसह सर्वच शहरांच्या मंदिरांमध्ये भक्तांनी हे वर्ष सुख समृद्धीचे जावे यासाठी प्रार्थना केली.
नव वर्षाचे स्वागत म्हटले, की थर्टी फर्स्टला होणारे ‘मदिरा’ सेलिब्रेशन असाच काहिसा माहोल रंगवला जातो. हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊस यावेळी हाऊसफुल असतात. अनेक ठिकाणी जंगी पार्ट्यांचे आयोजन होते. पण या सर्व पाश्चात्य संस्कृतीपासून थोडे अंतर ठेवत भक्तिभावाने नववर्षाला सुरुवात करणाऱ्याची संख्याही लक्षणीय आहे. त्याची प्रचिती २०२३ च्या पहिल्या दिवशीही दिसली. वास्तविक जोडून आलेल्या सुट्ट्या आणि नववर्षाची संधी साधत जिल्ह्यातून अनेक तरुण, भाविकांनी शिर्डी, शेगाव, पंढरपूर गाठले आहे. तर काहींनी जिल्ह्यातील प्रसिद्ध जागृत मंदिरांना भेटी दिल्या आहेत. अनेकांनी घराजवळ किंवा शहरातीलच मंदिरात हजेरी लावत पूजा, प्रार्थना केल्याचे रविवारी दिसून आले. यानिमित्ताने मंदिरांमध्‍येही फुलांची आरास करण्यात आली होती. ठाणे शहरातील कोपणेश्वर मंदिर, घंटाळी मंदिर, मुंब्रा देवी मंदिरात पहाटेपासून भाविकांची गर्दी होती.

डोंबिवली गणपती मंदिरात फुलांची आरास
डोंबिवली : डोंबिवली येथील श्री गणेश मंदिर संस्थानच्या प्रसिद्ध गणपती मंदिराचा गाभारा नववर्षासाठी आकर्षक फुलांच्या सजावटीने फुलून गेला होता. मंदिरात सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यामुळे भाविकांच्या रांगा आप्पा दातार चौकपर्यंत पोहचल्या होत्या. सायंकाळी पाचनंतर पुन्हा भाविकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली. विशेषत: सायंकाळच्या आरतीवेळी ही गर्दी लक्षणीय होती.

बदलापूर-मूळगाव येथील शिवकालीन जागृत खंडोबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळच्या बोचऱ्या थंडीची पर्वा न करता डोंगराच्या माथ्यावर ४५० पायऱ्या चढत भाविकांनी खंडेरायाचे दर्शन यावेळी घेतले. या भाविकांमध्ये तरुणाईची संख्या सर्वाधिक होती. तर अनेकांनी सहकुटूंब देवदर्शन घेतले.

अंबरनाथमध्‍ये भाविकांच्‍या रांगा
अंबरनाथ : नवीन वर्षानिमित्त दर्शन घेण्यासाठी अंबरनाथला प्राचीन शिवमंदिराप्रमाणे इतर मंदिरांत भाविकांची अलोट गर्दी झाली होती. रविवार आणि सुट्टीचा दिवस असून, वर्षाचा पहिलाच दिवस असल्याने शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांग लागली होती. मंदिराचे पुजारी विजय पाटील यांच्या हस्ते महादेवाची पूजा झाली. खेर विभागातील हेरंब मंदिर, स्वामी समर्थ मठात आणि गजानन महाराज मंदिर, दत्त मंदिरात देखील दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती.