
महिला सक्षमीकरणासाठी योजना राबवणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : ज्यांच्या पाठीशी स्त्रीशक्ती उभी असते, त्यांचा विजय निश्चित असतो. म्हणूनच महिलांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त योजना राबवून त्यांना आर्थिक सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने माजी आमदार रवींद्र फाटक यांनी ठाणे शहरातील किसननगर भागामध्ये युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाची सांगता ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी ठाणेकरांशी त्यांनी संवाद साधला. किसननगर, वागळे इस्टेट हा आपला बालेकिल्ला असून कर्मभूमी आहे. तुम्ही मला निवडून दिले, म्हणून मी आज मुख्यमंत्री बनू शकलो, अशी कृतज्ञता मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. राज्य सरकारच्या माध्यमातून सहा महिन्यांत मोठे निर्णय घेतले आहेत. पहिल्या दिवसापासून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम केले. म्हणूनच थोड्या अवधीतच ‘बाळासाहेबांची शिवसेना’ लोकप्रिय झाली, हे सांगायला मला अभिमान वाटत आहे, असेही ते म्हणाले.
पक्ष दुसऱ्या क्रमांकावर
राज्यात प्रत्येक ठिकाणी पक्षाच्या सभा, मेळावे दणक्यात होत आहेत. केवळ शहरापुरता पक्ष मर्यादित आहे, असे अनेक जण म्हणत होते; पण ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ काही महिन्यांचा हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे, ही बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला मिळालेली पोचपावती आहे. भविष्यातील निवडणुकांतही पक्षाला भरघोस यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.