मुजोर रिक्षा, टॅक्सीचालकांमुळे नागरिकांमध्ये संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुजोर रिक्षा, टॅक्सीचालकांमुळे नागरिकांमध्ये संताप
मुजोर रिक्षा, टॅक्सीचालकांमुळे नागरिकांमध्ये संताप

मुजोर रिक्षा, टॅक्सीचालकांमुळे नागरिकांमध्ये संताप

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबई उपनगरांत रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रमाण वाढले आहे. जवळचे भाडे नाकारले जात असून, मीटरचा वापर न करता मनमानी भाड्यांची वसुली केली जात आहे. यामध्ये मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गांवरील रेल्वे स्थानकांलगत असलेल्या रिक्षा, टॅक्सी थांब्यांवर सर्वाधिक प्रकार सुरू आहे; मात्र या प्रकरणात वाहतूक पोलिस आणि परिवहन अधिकारी विभागाची फक्त बघ्याची भूमिका दिसून येत आहे.

परिवहन विभागाच्या भरारी पथकामार्फत अनेक वेळा रिक्षा, टॅक्सीचालकांची विशेष तपासणी मोहीम घेतली जाते; मात्र तात्पुरती दंडात्मक कारवाई करून रिक्षा, टॅक्सी चालकांना समज देऊन सोडले जात असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे. वाहतूक पोलिसांकडून इतर वेळी रिक्षा, टॅक्सीचालकांना सूट देऊन कारवाईची आकडेवारी दाखवण्यासाठीच नाममात्र कारवाई होत असल्याने मुजोर रिक्षा, टॅक्सीचालकांची अद्याप रस्त्यांवर मुजोरी कायम आहे.

परिणामी, मुंबईबाहेरून पर्यटनासाठी किंवा रुग्णालयीन उपचारांसाठी येणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसतो आहे. मनमानी भाडे आकारून सर्वसामान्य नागरिकांची लूट केली जात असल्याच्या घटना मुंबई उपनगरांमध्ये घडत असल्याने अशा रिक्षा, टॅक्सी चालकांवर कठोर कारवाई कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रिक्षाचालकांकडून जवळचे भाडे नाकारण्याच्या बऱ्याच तक्रारी ग्राहकांकडून ऐकायला मिळत आहेत. रिक्षाचे भाडे वाढवून दिले तरी रिक्षाचालकांची मनमानी आणि मुजोरी कमी होताना दिसत नाही.
तसेच आजकाल मुंबई उपनगरात द्धा रिक्षात तीनपेक्षा जास्त प्रवासी घेऊन सर्रास वाहतूक होताना दिसत आहे. वर्सोवा जेटीपासून सातबंगला मेट्रो स्टेशनपर्यंत ही वाहतूक दिवसाढवळ्या बघायला मिळते. परिवहन विभागाने या सर्व गैरव्यवहारांना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे.
- शिरीष देशपांडे, कार्याध्यक्ष, मुंबई ग्राहक पंचायत

टॅक्सीचालकांनी भाडे नाकारल्‍यास, जादा भाडे घेतल्यास प्रवाशांनी विशेष मदत पथकाशी ९०७६२०१०१० या क्रमांकावर संपर्क करावा. अशा चालकावर कारवाई करण्यात येईल.
- भरत कळसकर, आरटीओ, ताडदेव