
रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक
कर्जत, ता. २ (बातमीदार) ः तालुक्यातील खांडपे-सांडशी रस्त्याच्या कामाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे २ कोटी ६२ लाख मंजूर झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी वर्क ऑर्डरही निघाली, त्यानंतर ठेकेदाराने तीन दिवस रस्त्याची खोदाई केली, तेव्हापासून हे काम अपूर्ण आहे. या अपूर्ण कामाचा फटका ग्रामस्थांना बसत असून रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. दोन वर्षांपासून काम बंद असल्याने ग्रामस्थांचा उद्रेक झाला असून रस्त्यावर उतरले आहेत. लवकरात रस्त्याची काम सुरू करावे, अन्यथा सात जानेवारीपासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी
प्रशासनाला दिला आहे.
कर्जत तालुक्यात भौगोलिक दृष्ट्या विस्तारलेला असून ग्रामीण भाग मोठा आहे. दोन वर्षांपूर्वी गावे जोडणाऱ्या पाच रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळाली होती. त्यासाठी सुमारे दहा कोटी रुपये कामांच्या निविदा नोव्हेंबर २०२० मध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१९-२० अंतर्गत ११ जून २०१९ मध्ये तालुक्यातील पाच कामांना मंजुरी देण्यात आली होती.
कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या खांडपे ते सांडशी रस्त्याचे कामासाठी दोन कोटी ६२ लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. यानंतर कामांची निविदा काढून ४ जानेवारी २०२१ मध्ये सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या कंपनीला ठेका मिळवला होता. त्यासाठी त्यांनी १२ टक्के कमी किमतीचा ठेका भरला होता.
मूळात ग्रामसडक योजनेचे काम विविध पातळीवर तपासले जाते. अभियंत्यांच्या देखरेखीखाली ते केले जाते, मात्र खांडपे-सांडशी रस्त्याच्या कामात या निकषांना बगल दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कुठेही कामाचे फलक नाहीत. ठेकेदाराने खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागते.
२०२० मध्ये मंजूर असलेले रस्त्याचे काम अद्याप होत नसल्याने रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. यात ठेकेदाराने १२ टक्के कमी दराने निविदा भरल्याने कामाच्या दर्जाबाबतही शंका उपस्थित होत आहे. रस्त्याचे अपूर्ण काम सुरू न केल्याने ७ जानेवारी रोजी ग्रामस्थांसह आमरण उपोषणाला बसू, असा इशारा घारे यांनी दिला आहे. यावेळी कोंडीवडे ग्रामपंचायत सरपंच प्रमोद देशमुख, जगदीश देशमुख, माजी उपसरपंच संदीप कुंभार, प्रल्हाद चौधरी, केतन बेलोसे, हरिश्चंद्र पायघुडे, रघुनाथ पाटील, पुंडलिक पाटील आदी उपस्थित होते.
वाहनांमध्ये बिघाड
पावसाळ्यात रस्त्यावरून वाहने चालवणे जिकरीचे झाले होते. दुचाकी चिखलात रुतत असल्याने तांत्रिक बिघाड होतो. त्यामुळे ग्रामस्थांनी रस्त्यावर खडीचा भराव केला होता. तालुक्याला जाण्यासाठी गावासाठी हा एकमेव रस्ता असून अनेक वर्षांपासून त्याची दुर्दशा झाली आहे.
रस्ते खोदून ठेकेदार गायब
चार किलोमीटरच्या रस्त्यांपैकी केवळ ५०० मीटरचे काम केवळ करण्यात आले आहे. उर्वरित रस्ता खोदून ठेकेदार गायब झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मूळगाव, तिवणे, माणगावतर्फे वासरे, सांडशी येथील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे, तर ठेकेदाराने केलेल्या कामापैकी काही ठिकाणच्या मोऱ्या अवघ्या काही दिवसांत खचल्या आहेत.
कर्जत ः रस्त्याच्या कामासाठी आक्रमक ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते.