तयार सिमेंट काँक्रीट प्रकल्पांना वेसण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तयार सिमेंट काँक्रीट प्रकल्पांना वेसण
तयार सिमेंट काँक्रीट प्रकल्पांना वेसण

तयार सिमेंट काँक्रीट प्रकल्पांना वेसण

sakal_logo
By

भाईंदर, ता. २ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्ग परिसरातील तयार सिमेंट काँक्रीट प्रकल्पातून (आरएमसी प्लांट) होत असलेल्या प्रदूषणाची मिरा-भाईंदर महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकल्पांमधून प्रदूषण होऊन त्याचा परिसरातील रहिवाशांना त्रास होऊ नये यासाठी महापालिकेने नवे धोरण निश्चित करून या प्रकल्पांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
काशी मिरा आणि घोडबंदर गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात तयार सिमेंट काँक्रीट प्रकल्प उभे राहत आहेत. या प्रकल्पांतून मोठ्या प्रमाणात धूळ हवेत पसरत आहे आणि त्याचा आसपासच्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक घरांमध्ये धुळीचे थर जमा होत आहेत. तसेच रहिवाशांना सर्दी, खोकला, दमा तसेच डोळे चुरचुरणे आदी आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. सिमेंट प्रकल्प रहिवासी क्षेत्रापासून किमान पाचशे मीटर दूर असावेत व प्रकल्पातून निघणाऱ्‍या धुळीचे संबंधित प्रकल्पांनी नियंत्रण करावे, असा ठराव महापालिकेने संमत केला आहे, पण हे नियम धाब्यावर बसवून अनेक प्रकल्प सुरू असल्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रकल्पांविरोधात स्थानिकांनी तसेच लोकप्रतिनिधींनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिसूचनेनुसार तसेच राज्य सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचना व निकष यांच्या आधारे दर सहा महिन्यांनी आरएमसी प्रकल्पांची पाहणी करून त्याचा अहवाल महापालिकेला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
...
तरच ना हरकत दाखला
महापालिकेने आरएमसी प्रकल्पांबद्दल हे सुधारित धोरण जारी केले असल्यामुळे प्रकल्पांना याआधीच्या धोरणांनुसार महापालिकेने दिलेल्या सर्व परवानग्या रद्द केल्या आहेत. या नव्या धोरणांचे पालन होत आहे की नाही याची खातरजमा केल्यानंतरच या प्रकल्पांना ना हरकत दाखला देण्यात यावा, असे आदेश आयुक्त दिलीप ढोले यांनी महापालिकेच्या संबंधित विभागांना दिले आहेत.
...
काय आहे धोरण?
महापलिकेने आरएमसी प्रकल्पांसंदर्भात नवे धोरण तयार करून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा नोटिसा आरएमसी प्रकल्पचालकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रकल्पाच्या परिसरातील खुल्या भागाचे काँक्रीटीकरण करणे, प्रकल्पामध्ये ध्वनी व धूळ नियंत्रण यंत्रणा बसवणे, प्रकल्पाच्या हद्दीवर सभोवताली वीस मीटर उंचीचे पत्रे लावणे व त्यावर हिरव्या रंगाची जाळी लावणे, विशिष्ट बांधकाम प्रकल्पासाठी उभारलेला आरएमसी प्रकल्प त्या बांधकाम परिसरातच असावा आदी सूचनांचा त्यात समावेश आहे.