
भूजल पातळीत घट
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : रायगड जिल्ह्यात विक्रमी पाऊस पडूनही भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात कमालीची घट होत असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत आढळले आहे. डिसेंबरमध्ये घेतलेल्या नोंदीनुसार, गेल्या ५ वर्षाचे तुलनेत या वर्षी भूजल पातळीत घट ०.४९ मीटर दिसून येते आहे. विहिरी, कुपनलिकांमधील पाण्याची पातळी खालावल्याने अनेक उपाययोजना करूनही रायगडमधील पाणी टंचाईवर मात करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.
सध्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना युद्ध पातळीवर सुरू आहे. २०२४ पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे; मात्र, या नळांना पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला पडला आहे.
जलजीवन मिशनसाठी जे उपलब्ध जलस्रोत आहेत, तेथून घरापर्यंत पाणी आणायचे आहे. मात्र भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने पाणीस्रोत सापडणे कठीण झाले आहे. रायगड जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना, पाणी आडवा, पाणी जिरवा यासारख्या योजना राबविण्यात आल्या आहेत, तरीही जलसाठ्यात वाढ झाली नसल्याचे अहवालावरून स्पष्ट होते.
रायगड जिल्हा हा मुख्यत्वे करून बेसाल्ट नावाच्या खडकाने व्यापला आहे. या खडकाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, तर म्हसळा, श्रीवर्धन, तळा, व मुरूड या तालुक्यामध्ये डोंगरमाथ्यावर लॅटेराईट या प्रकाराचा खडक आढळतो. या खडकात काही प्रमाणात पाणी साचून राहतो. परंतु बेसुमार वृक्षतोड, सिमेंट-काँक्रिटचे जंगल वाढल्याने पावसाचे पाणी थेट समुद्रात वाहून जात असल्याने ते जमिनीत मुरतच नाही. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठ्यावर परिणाम होत आहे. भविष्यात ही घट आणखी वाढल्यास रायगडमध्ये मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती भूगर्भ सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने आपल्या अहवालात नोंदविली आहे.
दर चार महिन्याने भूगर्भातील पाणी साठ्यावर सर्वेक्षण केले जाते. मात्र, अलिकडे केलेल्या नोंदी चिंता वाढवणाऱ्या आहेत. सुधागड, पोलादपूर तालुक्यातील डोंगराळ भागात काही विहिरींच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. यास अनेक घटक कारणीभूत आहेत, त्यात सुधारणा होणे आवश्यक आहेत. पाणी जिरविण्यासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- हनुमंत संघनोर, वरिष्ठ भूवैज्ञानिक,
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रायगड
जिल्ह्यातील भूगर्भातील पाणीपातळी
तालुके/ पाच वर्षातील सरासरी / यंदाची घट
अलिबाग /०.८८/ -०.७०
उरण /०.४३/ -०.८७
पनवेल /०.९५/ -०.६८
कर्जत /१.६५/ -०.१२
खालापूर /१.६२/ -०.४८
पेण /२.७७/ -०.५५
सुधागड /३.२९/ -०.६१
रोहा /१.३९/ -०.१४
माणगांव /०.७६/ -०.३४
महाड /२.३/ -०.५१
पोलादपूर /२.४४/ -०.६६
म्हसळा /०.८४/ -०.५८
श्रीवर्धन /१.०२/ -०.३८
मुरूड /०.५७/ -०.४७
तळा /०.४०/ -०.४०