बुस्‍टर डोसकडे ठाणेकरांची पाठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुस्‍टर डोसकडे ठाणेकरांची पाठ
बुस्‍टर डोसकडे ठाणेकरांची पाठ

बुस्‍टर डोसकडे ठाणेकरांची पाठ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : गेल्‍या अनेक महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला. ठाणेकरांनीदेखील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांपैकी केवळ १३.४३ टक्के नागरिकांनीचा बूस्टर डोस घेतला असल्याची बाब समोर आली आहे. आता चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा सुरू झाला असून, पुन्हा कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे बूस्‍टर डोस लसीकरण करून घेण्याकडे नागरिकांचा कल वाढू लागला असल्याचे दिसून येत आहे.

चीनसह काही देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून लसीकरणासह त्रिसूत्रीचा अवलंब करण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर नागरिकांनी कोरोना लसीचे लसीकरण करून घेण्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ८८ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला; तर ७९ टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने निर्बंधांमध्येही शिथिलता आली असून, नागरिकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झाली आहे.

परिणामी, कोरोना लसीकरण केंद्रांवर लस घेणाऱ्या नागरिकांची गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पहिली व दुसरी लस घेतल्यानंतर बूस्टर डोस घेण्याकडे नागरिकांना फारसा रस नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात केवळ १३.४३ टक्के नागरिकांनीच बूस्टर डोस घेतला असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
------------------------------------
अहवालातून नवीन बाब समोर
जिल्ह्यात १२ वर्षांवरील नागरिकांची आठ लाख १८ हजार २६५ इतकी लोकसंख्या आहे. यापैकी पहिली मात्रा चार लाख ९९ हजार ५८ जणांनी घेतली आहे. दुसरी मात्रा तीन लाख ६६ हजार ९०४ जणांनी घेतली आहे. १८ वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोसही देण्यात येत आहे, परंतु या वयोगटातील ७४ लाख ९७ हजार ५९६ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ६५ लाख ९८ हजार ७४० नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे; तर ५९ लाख ८१ हजार ७१७ जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. या तुलनेने बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प असून, केवळ आठ लाख ४३ हजार ५४० नागरिकांनी बूस्टर डोस घेतला असल्याची माहिती लसीकरण अहवालातून समोर आली आहे.

.......................................

एक ते दोन हजार डोस वाया
ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेणाऱ्या नागरिकांच्या संख्येतदेखील घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सुरुवातीला दीड ते दोन हजार नागरिकांचे लसीकरण होत होते; मात्र प्रादुर्भाव ओसरताच लसीकरण करून घेण्याच्‍या प्रमाणात घट झाली असून, दिवसाला ५०० ते ६०० नागरिक लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे नुकतेच कोव्हॅक्सीन लसीचे एक ते दोन हजार डोस वाया गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


१२ वर्षांवरील एकूण बालके ८,१८,२६५
पहिली मात्रा ४,९९,०५८
दुसरी मात्रा ३, ६६, ९०४
-------------------------------
१८ वर्षांवरील नागरिक
लसीकरणाचे उद्दिष्ट ७४,९७,५९६
पहिला डोस ६५,९८,७४०
दुसरा डोस ५९,८१,७१७
बूस्‍टर डोस ८,४३,५४०