
सावरकर-गोळवलकर चुकल्याबद्दल माफी मागा!
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : ‘अजितदादांनी माफी मागावी, अशी मागणी करणाऱ्या भाजपच्या लोकांनी सावरकर आणि गोळवलकर चुकले आहेत त्याबद्दल आधी माफी मागा. आमचे राजे काय स्त्रीलंपट होते का, असा प्रश्न करीत शिवपुत्र संभाजी राजे यांना स्त्रीलंपट आणि दारूड्या म्हणणाऱ्यांना आपण आपले आदर्श मानत आहात; त्यांच्याबद्दल आपले काय म्हणणे आहे, हे अजितदादांवर टीका करणाऱ्यांनी जाहीरपणे सांगावे’, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजे ‘धर्मवीर’ नव्हते तर स्वराज्य रक्षकच होते असे विधान केले. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने तात्काळ आक्षेप घेत आंदोलने केली. त्यावरून आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देत अजित पवारांवर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला. गेले काही दिवस छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत वापरल्या जाणाऱ्या स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर या शब्दांवरून बरीच वादावादी झाली आहे. खरे तर निष्कारण हा वाद काढण्यात आला. रयतेच्या राजाचे वारसदार छत्रपती संभाजी राजे हे होते. त्यामुळे ते कुठल्या एका धर्माच्या रक्षणासाठी बाहेर पडले असे कोणतेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत, असे आव्हाड म्हणाले.
कमी माहितीच्या आधारावर आपण जेव्हा एखाद्याला कोंडीत पकडायला जातो, तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही, तर इतिहासाची पाने बाहेर येतात. जर सगळं शांत असतं तर आम्ही गोळवलकर आणि सावरकर यांची ही पाने बाहेर काढलीच नसती, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.