
जाधव हल्ल्याचा तपास क्राईम ब्रॅंचकडे देण्याची मागणी
ठाणे, ता. ३ : भाजपचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास क्राईम ब्रॅंचकडे द्यावा. त्याचबरोबर वागळे इस्टेट पोलिसांच्या पक्षपाती वर्तनाची चौकशी करावी, अशी मागणी भाजपने पोलिस आयुक्त जयजित सिंग यांच्याकडे केली आहे. भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी (ता. २) ही आग्रही मागणी केली. कशिश पार्क व परिसरातील अतिक्रमणे व गैरप्रकारांविरोधात प्रशांत जाधव यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यावरून त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. कशिश पार्क परिसरात काही दिवसांपूर्वी फलक लावण्यावरून त्यांना रोखण्यात आले होते. त्या वेळी वागळे इस्टेट पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती; मात्र त्याची पोलिसांकडून दखल घेण्यात आली नाही. अशा परिस्थितीत जाधव यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी पूर्वनियोजित कट करून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आरोपी म्हणून ठाणे महापालिकेच्या दोन माजी नगरसेवकांसह काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे. त्यामुळे या हल्ल्याचा तपास क्राईम ब्रॅंचकडे द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.