शहापुरात आदिवासी पाड्यात पाणीटंचाईच्‍या झळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापुरात आदिवासी पाड्यात पाणीटंचाईच्‍या झळा
शहापुरात आदिवासी पाड्यात पाणीटंचाईच्‍या झळा

शहापुरात आदिवासी पाड्यात पाणीटंचाईच्‍या झळा

sakal_logo
By

खर्डी, ता. ३ (बातमीदार) : धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूर तालुक्यात ऐन हिवाळी हंगामात कसारा खुर्द आणि धामणी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी पाड्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नववर्षाच्‍या सुरुवातीला रहिवाशांना खासगी टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. कसारा खुर्दमधील पायरवाडी, नारळवाडी; तर धामणी ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील भोईपाडा आदिवासी वस्तीवर पाण्याचे दुर्भिक्ष ओढवल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांत विहिरीने तळ गाठला असून, पाण्याचा थेंबसुद्धा दिसेनासा झाला आहे. आतापासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने तालुका प्रशासनाला टंचाई भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याशिवाय पर्याय नाही. हिवाळ्यात या वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता जाणवण्यास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
-----------------------------------
जलस्रोत उपलब्‍ध नसल्‍याने चिंता
नववर्षातील जानेवारीसह आणखीन पाच महिने टँकरच्या पाण्यावर नागरिकांना विसंबून राहण्याची वेळ आली आहे. कसारा खुर्दचे ग्रामसेवक अनिल दांडकर, सरपंच निर्मला मांगे, उपसरपंच रूपाली सदगीर यांनी नारळवाडी, पायरवाडी येथील विहिरींची पाहणी करून तालुका प्रशासनाकडे टँकरची मागणी केली आहे. धामणी ग्रामपंचायतीचे सरपंच सुगंधा वीर, उपसरपंच कांचन घरत, माजी सरपंच अशोक वीर, सदस्य संजय भोईर, स्वरा सांडे यांनी टंचाई वस्तीला भेट देऊन तेथील कोरड्या पडलेल्या विहिरीची पाहणी केली. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच या वस्त्यांना जलस्रोत नसल्याने ग्रामस्थ पाणीटंचाईच्या विळख्यात सापडले आहेत. ही बाब वर्षानुवर्षे माहीत असतानाही केवळ विहिरींवरच ग्रामस्‍थांची मदार आहे.
------------------------------------------------------------------
भोईपाडा वस्तीतील विहिरीने तळ गाठल्याने येथील रहिवाशांवर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले असून येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीकडे मागणी केली आहे.
- सुगंधा वीर, सरपंच, धामणी.
--------------------------------------------------------------------
तहसीलदार विभागाच्या परवानगीशिवाय टँकर देता येत नाही. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्यास त्याचे मूल्यांकन टंचाई भागातील ग्रामपंचायतींना दिले जाईल.
- विकास जाधव, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती, शहापूर