
‘मित्र’च्या धुरा प्रवीण परदेशींकडे?
मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. ३ ः राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा निर्णय भरवेगाने अंमलात यावा, यासाठी नीती आयोगाच्या धर्तीवर शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र इन्स्टिट्युशनल ट्रान्सफॉर्मेशनची (मित्र) धुरा निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्याकडे दिली आहे. तसेच दिल्लीच्या धर्तीवर मुंबई महानगरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न हाताळण्यासाठी पोलिस दलात विशेष आयुक्तपद निर्माण केले जाणार आहे. त्यासाठी देवेन भारती यांचे नाव चर्चेत आहे.
राज्यात सत्तांतर होताच अस्तित्वात आलेल्या या ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय तसेच ठाणे परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजय अशर आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची नेमणूक करण्यात आली. अशर आणि क्षीरसागर या दोन्ही नेमणुका बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाशी संबंधित आहेत. भाजपचा कोणताही प्रतिनिधी अद्याप मित्रवर नेमला का गेला नाही, याची चर्चा सुरू असतानाच आता मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रवीणसिंह परदेशी यांना नेमले जाणार असे निश्चित झाले आहे. एका ज्येष्ठ मंत्र्याने पक्षीय वाटप नव्हे, तर महाराष्ट्राच्या हिताला सर्वाधिक महत्त्व दिले जात असल्याचे सांगितले.
यापूर्वी टाटा समूहाचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आर्थिक विकास परिषद नेमण्यात आली आहे. राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची व्हावी यासाठी शेती, व्यवसाय, बॅंकिंग या क्षेत्रांकडे विकास परिषद लक्ष देईल; मात्र या दोन्ही समित्या अधिक कार्यक्षम व्हाव्यात यासाठी एखादा सनदी अधिकारी नेमला गेला, तर महाराष्ट्राचा विकास अधिक गतिमान होईल, अशी चर्चा मंत्रिमंडळात झाली. ही जबाबदारी कोण सांभाळू शकेल अशी चर्चा सुरू होताच प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव समोर आले. परदेशी सध्या केंद्र सरकारच्या ‘मिशन कर्मयोगी’अंतर्गत देशभरातील सनदी अधिकाऱ्यांनी चालवलेल्या नव्या उपक्रमांचा आढावा घेत असतात.
----
देवेन भारतींकडे विशेष आयुक्तपद
दरम्यान, दिल्लीच्या धर्तीवर मुंबई महानगरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न हाताळण्यासाठी पोलिस दलात विशेष आयुक्तपद निर्माण केले जाणार आहे. त्यांच्याकडे गुन्हे अन्वेषण, कायदा व सुव्यवस्था अशी काही खाती विशेष आयुक्तांकडे वर्ग केली जातील असे समजते. देवेन भारती या अधिकाऱ्याचे नाव या पदासाठी चर्चेत आहे. याला दुजोरा देताना गृहखात्यातील एका अधिकाऱ्याने एकदोन दिवसांत संबंधित आदेश जारी होईल अशी माहिती दिली. मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांचे अधिकार अबाधित राहातील, असेही सांगितले जात आहे.
---
भाजपचा समांतर कारभार?
प्रवीणसिंह परदेशी आणि देवेन भारती या दोन अधिकाऱ्यांवर असलेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास लक्षात घेता हा भाजपचा समांतर कारभार हाकण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा प्रश्न केला जातो आहे; मात्र शिंदे-फडणवीस यांच्यातील वर्चस्वाची सुप्त लढाई हे असंतुष्टांचे इच्छाचिंतन आहे. महाराष्ट्रातील गुंतवणूक प्रकल्प बाहेर गेल्याने धडा शिकून कामाला लागण्यावर भर द्या, असे दोन्ही नेत्यांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. राज्यातील औद्योगिक क्षेत्रात प्रगती व उत्पादनाला गती मिळावी यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमवेत काही महत्त्वाच्या कामगार संघटना नेत्यांशी नुकतीच चर्चा केल्याचे समजते.