
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
डोंबिवली, ता. ४ (बातमीदार) : पाच तोळे सोने असलेली बॅग रिक्षात विसरलेल्या महिलेला संबंधित रिक्षाचालकाने बॅग परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. त्यामुळे रिक्षाचालक संतोष राणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काही दिवसांपूर्वी डोंबिवली पश्चिम येथे राहणाऱ्या दीपाली राजपूत यांनी सोमवारी दुपारी रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी श्रम साफल्य बंगला येथून रिक्षा पकडली आणि रेल्वे स्थानक येथे पोहोचल्यानंतर त्यांना बॅग रिक्षात विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित रिक्षा शोधण्यासाठी रेल्वे स्थानकाबाहेर धाव घेतली. आजूबाजूला शोधूनही रिक्षा सापडली नाही. त्यानंतर दीपाली राजपूत यांनी रिक्षा स्टँडवर जाऊन चौकशी केली. तेथे असलेले रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष भगवान मोरजकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दीपाली राजपूत यांच्यासह संबंधित रिक्षाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रिक्षाचालक संतोष राणे यांनी दीपाली राजपूत यांना त्यांची पाच तोळे सोने असलेली बॅग परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले होते. त्यामुळे मनसेचे डोंबिवली विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी रिक्षाचालक संतोष राणे यांचा शाल, श्रीफळ आणि पाच हजार रुपये देऊन सत्कार केला. कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी आणि सहायक निरीक्षक रमेश कल्लरकर यांनीही त्याचा सत्कार केला.