
जय सागर जलाशय बनला मद्यपींचा अड्डा
जव्हार, ता. ४ (बातमीदार) : शहराला पाणीपुरवठा करणारे जय सागर जलाशय शहरापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर एक पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. पण सायंकाळी जलाशयाचा परिसर मद्यपींचा अड्डा बनला आहे. यामुळे या परिसरात बाटल्या आणि कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. मात्र या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शहरातील नागरिक करीत आहेत.
संस्थानकालीन जव्हारच्या पाणी पुरवठा यंत्रणेसाठी श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराज यांनी या जलाशयाची निर्मिती ६० वर्षांपूर्वी केली होती. तेव्हापासून आजतागायत जव्हार शहरातील नागरिकांना जयसागर जलाशय हा एकमेव पिण्याच्या पाण्याचा आधार आहे. पण या जलाशयाचा ताबा मद्यपींनी घेतला आहे. त्यामुळे या जलाशय परिसरात कचरा टाकत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. तसेच या भागात सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारे उपाययोजना किंवा सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत.
...
जय सागर जलाशय परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक किंवा धोक्याची सूचना असलेले सूचना फलक लावणे गरजेचे आहे. तसेच कोणी मद्यपान करताना दिसल्यास त्या व्यक्तीकडून दंडात्मक कारवाई करावी. यामुळे ठिकाणी मद्यपींचे प्रमाण कमी होईल.
- इमरान कोतवाल, उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पालघर जिल्हा
...
जय सागर जलाशय परिसरात अनेकदा जव्हार नगर परिषदेमार्फत धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत. हे फलक फाडले जातात किंवा चोरी होत आहेत. या भागात चांगल्या प्रकारे सुरक्षा राहावी याकरिता कार्यालयीन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
- मानिनी कांबळे, मुख्याधिकारी, जव्हार नगरपरिषद