ज्वेलर्स दुकानातील महिला कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्वेलर्स दुकानातील महिला कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल
ज्वेलर्स दुकानातील महिला कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

ज्वेलर्स दुकानातील महिला कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By

अंधेरी, ता. ५ (बातमीदार) ः वांद्रे येथील गेहना ज्वेलर्समध्ये कामाला असलेल्या पायल संकेत परब या महिलेविरुद्ध वांद्रे पोलिसांनी अपहाराचा दोन दिवसांपूर्वी गुन्हा नोंदवला आहे. तिच्यावर सहा लाख रुपयांच्या हिऱ्यांचा अपहार केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुनील वासुदेव दत्तवाणी हे वांद्रे येथील गेहना ज्वेलर्समध्ये कामाला आहेत. या ठिकाणी एकूण ५० कामगार असून तिथे हिरेजडित सोन्याचे दागिने बनवले जातात. त्यानंतर या दागिन्यांची दुकानात विक्री केली जाते. पायल ही गेल्या चार वर्षांपासून तिथे कामाला असून तिच्याकडे काही हिरे असतात. गरजेनुसार ती कारागिरांना हिरे देते, तसेच इतर हिऱ्यांची नोंद ठेवते. गेल्या काही दिवसांत दुकानातील काही हिरे चोरीस गेल्याचे दिसून आले होते. त्यामुळे मालकांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली होती. त्यात पायल ही हिरे चोरी करताना दिसून आली होती. हा प्रकार निदर्शनास येताच तिच्याकडे विचारणा करण्यात आली होती. या वेळी तिने दहा कॅरेट हिरे चोरी केल्याची कबुली देताना चार दिवसांत चोरीचा मुद्देमाल परत करण्याचे आश्‍वासन दिले होते. या वेळी तिने तिच्याकडील नेकलेस सेट, एक मंगळसूत्र, एक चेन आणि एक अंगठी एका कर्मचाऱ्या‍ला दिली होती; मात्र तिने चोरीचा मुद्देमाल परत केला नाही. कॉल केल्यानंतर तिने त्यांच्याविरुद्ध खोटी तक्रार करून त्यांना खोट्या गुन्ह्यात अटक करण्यास भाग पाडू अशी धमकी दिली होती. या प्रकारानंतर सुनील दत्तवाणी यांनी वांद्रे पोलिसांत पायलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी अपहाराचा गुन्हा नोंदवला आहे.