
सायबर चोराकडून २१ हजारांचा गंडा
नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर): ऐरोलीतील एका व्यावसायिकाला ओएलएक्सवरून बंकबेड विकण्याच्या प्रयत्नात एका सायबर चोराने २१ हजारांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
ऐरोलीतील एका आयटी कंपनीत कार्यरत असणारे सुरेंद्र ठोंबरे (वय- ४३) यांनी २९ डिसेंबर रोजी घरातील ५ बंक बेड विकण्यासाठी ओएलएक्सवर फोटो अपलोड केले होते. त्याच दिवशी रात्री त्यांना राहुल शर्मा नामक व्यक्तीने संपर्क साधून सर्व बंक बेड विकत घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बंक बेड खरेदी विक्री करण्याचा व्यवहार ठरल्यानंतर राहुल शर्मा याने बंक बेड घेण्यासाठी घरी कामगार पाठवल्याचे सांगितले. त्यानंतर पेटीएमद्वारे पैसे पाठविण्याचा बहाणा करून दोन क्युआर कोड पाठवले. तसेच क्युआर कोडवरून ठोंबरे यांच्या खात्यात १० रुपये जमा केले. त्यामुळे ठोंबरे यांचा विश्वास बसल्यानंतर पुन्हा क्युआर कोड पाठवला होता. त्यावर स्कॅन केल्यानंतर ठोंबरे यांच्या खात्यातून २१ हजाराची रक्कम गेली होती. त्यामुळे ठोंबरे यांनी राहुल शर्मा याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद असल्याचे आढळल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठोंबरे यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.