पारंपारिक भांडीसह आकर्षक सजावटीच्या वस्‍तू खरेदीला वाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारंपारिक भांडीसह आकर्षक सजावटीच्या वस्‍तू खरेदीला वाव
पारंपारिक भांडीसह आकर्षक सजावटीच्या वस्‍तू खरेदीला वाव

पारंपारिक भांडीसह आकर्षक सजावटीच्या वस्‍तू खरेदीला वाव

sakal_logo
By

माणदेशी महोत्सवात ‘हस्तकले’चा उत्सव!
पारंपरिक भांड्यांसह आकर्षक सजावटीच्या वस्‍तूंची ग्राहकांना भुरळ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : ग्रामीण भागातील उद्योजक महिलांचे हक्काचे व्यासपीठ असलेला पाचवा माणदेशी महोत्सव गुरुवार (ता. ५) पासून प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणात भरला आहे. तीन दिवस सुरू राहणाऱ्या महोत्सवाच्या माध्यमातून विविध लोककलांचे सादरीकरण, जिन्नस आणि वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखता येणार आहे. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या महिला लघुउद्योजकांचा सहभाग महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले असून त्यांनी घडवलेल्या अनेक वस्तू त्यांच्यातील कलेची प्रचीती देत आहेत.
हिरव्या भाज्या, छोटी-मोठी बोरं, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, पापड, कुरडया, चटण्या, मिरचीचा खरडा आणि इतर खाद्यपदार्थांसह मातीच्या वस्तू, पोळपाट-लाटणे, जेवणासाठी वापरली जाणारी मातीची भांडी, केरसुणी, पाटा, वरवंटा आणि हस्तकलेतून साकारलेल्या घोंगड्या, महिलांसाठी खणाच्या किंवा वेगवेगळ्या कापडांपासून तयार केलेले दागिने इत्यादी साहित्य महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध आहे. अगदी कमीत कमी दरात जास्तीत जास्त साहित्याची खरेदी इथे करता येईल. ८ जानेवारीपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे.

‘मी ३० वर्षांपासून तालुक्यात भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करते. आम्ही आमच्या शेतात भाज्या पिकवतो. कोणतेही रासायनिक घटक वापरत नाही. मुंबईत मिळणाऱ्या आणि शेतात पिकवलेल्या भाजीत फरक असतो. चव आणि सुगंध वेगळाच असतो. गावची भाजी आवडीने मुंबईकर खातात. मी फक्त माणदेशी व्यासपीठावरच स्टॉल लावते,’ असे साताऱ्यातील म्हसवड तालुक्यातील भाजीविक्रेती सिंधू पिसे यांनी सांगितले. ‘पहिल्यांदा माणदेशीने साताऱ्यात व्यासपीठ खुले करून दिले. आता मुंबईत आम्ही पहिल्यांदाच स्टॉल लावला आहे. मी ३० घोंगडींचा व्यवसाय करतोय. आम्हाला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. फ्रान्स, अमेरिका, दिल्ली इत्यादी अनेक ठिकाणी घोंगड्या पाठवल्या आहेत. मुंबईकरांचा कायम पाठिंबा असतो. आम्ही घोंगडी स्वतः हातांनी बनवतो,’ असे इंदापूरमधील घोंगडी विक्रेते जगन्नाथ कुचेकर यांनी सांगितले.
२०१३ पासून आम्ही माणदेशीसोबत काम करत आहोत. माणदेशी फाऊंडेशनने व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली. पाण्याचा माठ किंवा मातीचे कप, माती आणि घोड्याच्या शेणाचे मिश्रण करून मातीची भांडी घडवली जातात. मातीची भांडी बनवण्यात कला आणि कष्ट दोन्ही आहे, असे अनिता कुंभार म्हणाल्या. प्रत्येक वर्षी माणदेशीकडून आम्हाला स्टॉल लावण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. केरसुणीसह इतर सर्व वस्तू आम्ही विकतो, असे ७५ वर्षांच्या कांताबाई साळुंखे यांनी सांगितले.

मूकबधिर मुलींना रोजगार
आम्ही हॅण्डमेड ज्वेलरी तयार करतो आणि विकतो. आमच्यासह चार मूकबधिर मुली काम करतात. ५० ते ५०० रुपयांपर्यंत दागिन्यांची किंमत आहे. हुबळीपासून ते थेट परदेशांत आम्ही दागिने पाठवतो. साडी किंवा कपड्यांच्या रंगांनुसार दागिने लगेच तयार करून आम्ही देतो. मी प्रथमच माणदेशीला स्टॉल लावला आहे.
- विद्या कासकर, हस्तकलेतून साकारलेल्या दागिन्यांची विक्रेती

परंपरागत व्यवसाय
आमची आधीची आणि आताची पिढी दगडापासून खलबत्ते, पाटा, वरवंटा, जाते, महादेव पिंड आणि इतर वस्तू तयार करते. आमचा व्यवसाय परंपरागत आहे. सर्व वस्तू दगडापासून तयार केल्या जातात. ७०० ते १२०० पर्यंत वस्तूंची किंमत आहे.
- राधाबाई चौगुले, विक्रेती, विटा (सांगली)

आम्ही पिढीनुसार व्यवसाय करत आहोत. मुंबईत पहिलाच अनुभव आहे. गेली आठ वर्षे मी माणदेशीसोबत काम करत आहे. मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. फक्त कष्टाचे पैसे घेतो. कलेचा अनुभव आम्ही आमच्या वस्तूत उतरवतो.
- तान्हाजी यादव, पोळपाट-लाटणे विक्रेता, औंध

‘रेडिओ जॉकी’ केराबाई सरगरांची प्रमुख उपस्थिती
व्यवसायाने रेडिओ जॉकी असलेल्या साताऱ्यातील केराबाई सरगर प्रमुख पाहुण्या म्हणून माणदेशी महोत्सवात उपस्थित होत्या. कष्ट करणाऱ्या शेतकरी महिला, बांधवांना इथे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मी लहानपणापासूच गाणी ऐकायची. लग्नानंतरही आवड सुटली नाही; पण माझ्या मुलाने माणदेशी तरंगवाणी रेडिओ स्टेशनमध्ये माझ्यासाठी बोलणी केली आणि माझे नशीब बदलले. हा प्रवास आता न थांबणारा आहे, असे त्या म्हणाल्या.

मी एक शेतकरी महिला आहे. माणदेशीसोबत १७ वर्षे काम करत आहे. माझ्या कंपनीत ५०० महिला सभासद आहेत. त्यांना सर्वांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता आम्ही माती परीक्षणाची प्रयोगशाळा तयार केली आहे. कमी खर्चात सुपीक शेती कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
- वनिता पिसे, उद्योजिका, माणदेशी फाऊंडेशन, म्हसवड