वीज खंडित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज खंडित
वीज खंडित

वीज खंडित

sakal_logo
By

वीजचोरी करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई!
चेंबूर परिसरात अदाणी कंपनीचा ‘शॉक’

चेंबूर, ता. ५ (बातमीदार) ः अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या विद्युत खांबातून चोरीची वीजजोडणी घेऊन चेंबूरमधील एन. जी. आचार्य मार्ग आणि उपनगरातील पदपथांवर बस्तान मांडून व्यवासाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. वीजचोरीची दखल घेत ‘अदाणी’च्या दक्षता पथकाने बुधवारी रात्री धडक कारवाई करून फेरीवाल्यांची वीज खंडित केली.
चेंबूर परिसरातील एन. जी. आचार्य मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, टेम्बे पूल आणि टिळकनगर रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूंच्या संपूर्ण परिसरातील पदपथावर फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. यापूर्वी परिसरातील पदपथावर एकूण ४०० फेरीवाले होते. आज एकूण १२०० पेक्षा अधिक फेरीवाले तिथे आहेत. सध्या तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळील सर्कल, झाडाचे कट्टे आणि पदपथही फेरीवाल्यांनी सोडलेले नाहीत. त्याचा फटका पादचारी व नागरिकांना बसत आहे. उपनगरात विविध विभागांतील पदपथावर बसणारे कित्येक फेरीवाले अदाणी वीज कंपनीने मार्गावर लावलेल्या विजेचे खांब व बॉक्समधून बिनधास्त वायर टाकून त्यातून वीज चोरी करीत आहेत. चोरीने घेतलेली वीजजोडणी फेरीवाले संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवतात. अदाणी वीज कंपनीच्या दक्षता पथकाने बुधवारी रात्री ८ वाजता एन. जी. आचार्य मार्गावरील पदपथावर फेरीवाल्यांची चोरी करून घेतलेली वीजजोडणी खंडित केली.
वीज चोरी करणारा फेरीवाला असो किंवा घरधारक, आमचे दक्षता पथक महिन्यातून दोन वेळा कारवाई करून वीजजोडणी खंडित करत असते, असे अदाणी वीज कंपनीच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

वीज चोरणाऱ्या फेरीवाल्यांवर अदाणी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी आणि पोलिस व पालिका अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करून त्यांच्यावर एफआयआर नोंदवून त्यांना अटक करणे गरजेचे आहे. वीजचोरीला पालिका अधिकारी व पोलिसही जबाबदार आहेत. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळील पदपथ, सर्कल व झाडाच्या बांधावरही फेरीवाल्यांनी सर्रास कब्जा केला आहे. त्याला जबाबदार पालिका आहे.
- विशाल गायकवाड, समाजसेवक, नेस्ट संस्था