स्नेहसंमेलने, शैक्षणिक सहलींचा हंगाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्नेहसंमेलने, शैक्षणिक सहलींचा हंगाम
स्नेहसंमेलने, शैक्षणिक सहलींचा हंगाम

स्नेहसंमेलने, शैक्षणिक सहलींचा हंगाम

sakal_logo
By

नवीन पनवेल ः वार्ताहर
कोरोना वैश्विक संकटानंतर पनवेल परिसरातील शाळांमध्ये तब्बल दोन वर्षांनंतर वार्षिक स्नेहसंमेलन करण्यात येत आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक सहलींना बहर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
---------------------------------------------
पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी शिक्षण संस्था आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेसह इंग्रजी शाळांचाही समावेश आहे. या सर्व शाळांमध्ये शैक्षणिक उपक्रम वर्षभर राबवले जातात. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमांचाही समावेश असतो. विशेष करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील दडलेले सुप्त गुण बाहेर यावेत, या उद्देशाने सर्वच शाळांमध्ये दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन होते. या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. याकरिता किमान महिनाभर विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला जातो. भारतीय संस्कृतीच्या दर्शनाबरोबरच, पारंपरिक आणि आधुनिक नृत्याचा त्यामध्ये समावेश असतो, पण कोरोना वैश्विक संकटामुळे गेली दोन वर्षे शाळा बंद होत्या. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी वार्षिक स्नेहसंमेलने मात्र झाली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला नाही, परंतु यंदाचे शैक्षणिक वर्ष जवळपास निर्विघ्न सुरू झाल्याने अभ्यासक्रमांव्यतिरिक्त इतर उपक्रमांना शाळा व्यवस्थापनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, खारघर, कामोठे आणि आजूबाजूच्या परिसरातील शाळांमध्ये सध्या स्नेहसंमेलनाची लगबग सुरू झाली असून विद्यार्थ्यांमध्येही कमालीचा उत्साह आहे.
-----------------------------------
गुणवंतांना प्रोत्साहनाची थाप
यंदा वार्षिक गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभसुद्धा होत आहेत. शाळांमध्ये त्यासंदर्भात नियोजन सुरू झाले आहे. कला-क्रीडा त्याचबरोबर शैक्षणिक नैपुण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना या समारंभामध्ये गौरवण्यात येते. कोरोनानंतर गुणगौरवाचा कार्यक्रमसुद्धा पार पडणार आहे. त्याचबरोबर वार्षिक क्रीडा स्पर्धाही होणार आहेत.
--------------------------------
ऐतिहासिक स्थळांचे विद्यार्थ्यांना दर्शन
कोरोनामुळे विविध शाळांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून शैक्षणिक सहली गेल्या नव्हत्या. कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून त्यावर निर्बंध घालण्यात आले होते; मात्र यंदा पनवेल आणि आजूबाजूच्या वसाहतींमधील शाळांच्या मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहली काढल्या जात आहेत. कोकण दर्शन त्याचबरोबर कोल्हापूर, वेरूळ अजिंठा, नाथ सागर याशिवाय ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे.