
ज्येष्ठांना पोलिसांचा मदतीचा हात
प्रकाश लिमये, भाईंदर
ज्येष्ठ नागरिक हे कोणत्याही गुन्हेगारांचे सॉफ्ट टार्गेट असतात. रस्त्यात अथवा घरात एकटेदुकटे गाठून त्यांना लुबाडणे, एटीएम केंद्रात त्यांची फसवणूक करणे असे गुन्हे सर्रास घडतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अशा गुन्ह्यांपासून स्वत:ला कसे वाचवायचे, गरज भासल्यास पोलिसांशी कसा संपर्क साधायचा, याचे मार्गदर्शन पोलिस स्थापना दिन सप्ताहानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मिरा रोड येथे देण्यात आले.
अनेक ज्येष्ठ नागरिकांना सकाळी अथवा सायंकाळी फिरायला जाण्याची सवय असते. अशा ज्येष्ठ नागरिकांवर पाळत ठेवून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचून नेल्या जातात किंवा आपण पोलिस आहोत, पुढे एक गंभीर गुन्हा घडला आहे, तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने आमच्याकडे सुरक्षित ठेवा, अशी बतावणी करूनही ज्येष्ठ नागरिक लुबाडले जाते. तसेच घरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची घरे लुटल्याचे गुन्हे अनेक वेळा घडले आहेत. एटीएम केंद्रात पैसे काढायला गेलेल्या वरिष्ठ नागरिकांवर तर गुन्हेगारांचे विशेष लक्ष असते. एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अनेक वेळा तांत्रिक अडचण येते. एटीएम कार्ड यंत्रात व्यवस्थित टाकले नाही, तर यंत्रातून पैसे बाहेर येत नाहीत. अशा वेळी मदत करण्याच्या बहाण्याने गुन्हेगार पुढे सरसावतात व शिताफीने हातचलाखी करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढतात. ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचेही गुन्हे घडत असतात. गुन्हा घडल्यानंतर तत्काळ पोलिसांशी संपर्क कसा करायचा, याची माहिती ज्येष्ठ नागरिकांना नसते. त्यामुळे गुन्हेगार पसार होतात. अशा ज्येष्ठ नागरिकांनी सतर्क कसे राहावे, हे गुन्हे कसे घडतात, त्यातून फसवणूक होऊ नये, यासाठी काय खबरदारी घ्यावी, सकाळी - सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी, यासंदर्भात पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.
...
संकटकाळी ११२ वर संपर्क साधा
पोलिसांशी तत्काळ संपर्क साधण्यासाठी डायल ११२ ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास अवघ्या काही मिनिटांत पोलिस घटनास्थळी दाखल होतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा अवश्य वापर करून पोलिसांची तत्काळ मदत मिळवावी, असे आवाहन पोलिसांनी यावेळी केले. ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी व त्यांच्या समस्याही पोलिसांनी यानिमित्त समजावून घेतल्या.