
माणदेशी साहित्याला मुंबईकरांचा भरघोस प्रतिसाद
‘माणदेशी स्टार्टअप’चा मुंबईत बोलबाला
महोत्सवात महिला लघुउद्योजकांच्या वस्तूंना भरघोस प्रतिसाद
भाग्यश्री भुवड, मुंबई
प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात रंगलेल्या माणदेशी महोत्सवात विविध प्रांतातून आलेल्या महिला उद्योजकांनी बाजी मारली. ‘माणदेशी स्टार्टअप’च्या विविध वस्तूंचा बोलबाला पाहायला मिळाला. मुंबईकरांचा भरघोस प्रतिसाद मिळालेल्या माणदेशी महोत्सवाची रविवारी (ता. ८) सांगता होणार असून अनेक शेतकरी आणि कारागिरांचा माल संपत आल्याचे माणदेशी फाऊंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा यांनी सांगितले.
--
माणदेशी महोत्सवात राज्याच्या विविध भागांतून आलेल्या व्यावसायिकांनी आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन मांडले होते. विशेष लक्ष वेधून घेतले ते महिला उद्योजकांनी. विविध गाव-खेड्यांतून अगदी आदिवासी पाड्यांतून मुंबईत डेरेदाखल झालेल्या छोट्या छोट्या महिला स्टार्टअपच्या वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळाला. अगदी भाज्यांपासून फुलदाण्या, पोळपाट-लाटणे, तेल, टोपल्या आणि खोबऱ्याचे पेढ्यांपासून रजईपर्यंतच्या वस्तू इथे विकल्या गेल्या. त्याही अगदी माफक दरात. तीन दिवसांपासून जवळपास १५ ते २० हजारांहून अधिक नागरिकांनी महोत्सवात उपस्थिती दर्शविली.
‘आम्ही आदिवासी पाड्यातून आलो आहोत. जंगलातील मशरूम आम्ही इथे आणले आहेत. मशरूम मॅगी, पुलाव, सूप, पिझ्झा इत्यादी पदार्थ तयार केले जातात. आम्ही प्रथमच महोत्सवात सहभागी झालो. मुंबईकरांनी खूप चांगला प्रतिसाद दिला,’ असे वापीहून आलेल्या मशरूम विक्रेत्या रसिला वळवे यांनी सांगितले. साताऱ्याहून आलेल्या बेबी हिरा जाधव म्हणाल्या, की फुलदाण्या, टोपल्या, मोठ्या करंड्या, नेवाळे, बुट्टीचे करंडे आणि भाकऱ्या ठेवण्यासाठी छोट्या-मोठ्या टोपल्या, डालगे, साळोती, सूप इत्यादी वस्तू लाकडापासून तयार केल्या जातात. त्याला खरेदीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सुरुवातीला सीझननुसार व्यवसाय करायचो; पण कालांतराने आम्ही भेळपुरी आणि इतर चाटचे पदार्थ घरी बनवायला लागलो. सुरुवातीला २०० ते ३०० रुपये दर महिन्याला व्यवसाय व्हायचा. आता व्यवसायाचा आवाका वाढला आहे. माणदेशीत जेव्हा स्टाॅल लावला तेव्हा पहिल्या वर्षी ८९ हजार एवढे उत्पन्न मिळाले होते, असे साताऱ्यातील भेळपुरीविक्रेत्या रेणुका घोरपडे यांनी सांगितले.
आयुर्वेदिक औषधींपासून तेल-काढे तयार केले जातात. सांधेदुखीसाठी आयुर्वेदिक निर्गुडी तेल विकतो. कोणत्याही रसायनाशिवाय आम्ही असे तेल बनवतो. आम्ही विशेष प्रशिक्षण घेतले आहे. परदेशातूनही तेलाला मागणी आहे, असे नाशिकच्या आयुर्वेदिक औषधविक्रेत्या जयवंती भोये म्हणाल्या. माणदेशीसोबत सहा वर्षे प्रवास करत आहोत. मुंबईत स्टाॅल लावण्याची दुसरी वेळ आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे घोंगडीविक्रेते कौसर नदाब यांनी सांगितले.
आम्ही घरगुती पद्धतीचे झणझणीत मसाले तयार करतो. तिसऱ्या वर्षापासून व्यवसाय करत असून माणदेशीने मोठे व्यासपीठ दिले आहे. मागणी असल्यास कुरियरनेही मसाले पाठवले जातात, असे लातूरच्या ‘गंगू आजी मसाले’च्या अंजली पाटील यांनी सांगितले. माणदेशीमध्ये दोन वर्षांपासून आहोत. दिवाळीसाठी लागणारे सर्व प्रकारचे पदार्थ तयार करतो. भाजणी चकली, चिवडा आणि बुंदी लाडू असे पदार्थ आम्ही बनवतो. आठ महिला मिळून वर्षभर आम्ही पदार्थ तयार करत असतो, असे कामोठ्याच्या अपर्णा जंगम यांनी सांगितले.
हस्तकलेतून साकारलेल्या वस्तूंना मागणी
‘आम्ही वाॅशेबल कापसापासून रजई तयार करतो. मुंबईत एवढी थंडी नसते, तरीही अनेकांनी ती विकत घेतली. चार वर्षांपासून माणदेशीसोबत आहोत. तयार कापडापासूनही रजई बनवून देतो. काही महिला हौशीने खरेदी करतात,’ असे नाशिकच्या शीतल पाटील म्हणाल्या. मुंबईत पहिल्यांदाच आलो आहोत. व्यवसायासाठी एवढे मोठे व्यासपीठ मिळाले त्याचा आनंद आहे. जागतिक उलाढाल करण्याची संधी आहे. आमच्या हस्तकलेतून साकारलेल्या वस्तूंना इथे मागणी आहे. बांबूपासून तयार केलेल्या एका टोपलीला बनवण्यासाठी एक दिवस जातो, असे पुण्याहून आलेल्या मीना पाडवी यांनी सांगितले.
भारुडातून आवाहन
‘माझ्या गुरू चंदाताई तिवाडी यांच्यासोबत मी आठ वर्षे काम करत आहे. एक स्त्री एवढा मोठा प्रपंच सांभाळते याचा गर्व वाटतो,’ असे सांगलीतील चिपळीवादक सुप्रिया खरे यांनी सांगितले. चंदाताई तिवाडी यांनी आपल्या भारुडातून नागरिकांना महोत्सवातील व्यवसायाला भरभरून प्रतिसाद द्यावा, यासाठी आवाहन केले होते.
माणदेशीसोबत दुसरे वर्ष आहे. खोबऱ्याचे पेढे असा नवा पदार्थ आम्ही तयार करतो. २५ वर्षे व्यवसायात असून आणखी दोन महिला आमच्यासोबत काम करतात.
- जयश्री मोडक, मोडक फूड, घाटकोपर
दीड वर्षापासून माणदेशीसोबत जोडले गेले आहे. कुडाळच्या बचत गटातून अनेक स्टाॅल आम्ही लावतो. कोकणातील सर्व पदार्थ आमच्याकडे मिळतात. माझ्यासोबत अनेक महिला जोडल्या गेल्या आहेत.
- प्राची वारंग, पनवेल