
विज्ञान प्रदर्शनामध्ये हिलरी विद्यालय प्रथम
भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : शहरातील चाचा नेहरू हिंदी हायस्कूलमध्ये भिवंडी पंचायत समितीद्वारे भरवलेल्या ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अंजूरफाटा येथील हिलरी विशा ओसवाल विद्यालयाच्या प्रकल्पाने प्रथम, चाविंद्रा येथील आशीर्वाद हिंदी हायस्कूलच्या प्रकल्पाने दुसरा क्रमांक पटकावला; तर काल्हेर येथील परशराम धोंडू टावरे विद्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती भानुदास पाटील यांनी स्वयंचलित रॉकेट लॉन्च करून केले. या वेळी उपसभापती मुशीर नाचन, गटशिक्षण अधिकारी नीलम पाटील, चाचा नेहरू हायस्कूलचे संस्था सचिव त्रिलोकचंद जैन, मुख्याध्यापक प्रेमनाथ दुबे, उपमुख्याध्यापक गीता मेहुल-जोशी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. भिवंडी पंचायत समितीद्वारे आयोजित केलेल्या या प्रदर्शनात १०० विद्यालयांनी भाग घेतला होता. बक्षीस वितरण समारंभ आमदार निरंजन डावखरे, शिक्षण क्रांती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुधीर घागस आणि पंचायत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रदर्शनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी संजय अस्वले, वि. पी. मौर्य यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.