
माहीमच्या चर्चमध्ये अज्ञाताकडून तोडफोड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : माहीममधील सेंट मायकल चर्च परिसरात शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. आरोपीचे कृत्य सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कॅथलिक समाजाने याबाबत खेद व्यक्त केला आहे.
मुंबईतील माहीम परिसरात शनिवारी सकाळी ६ वाजता एका अज्ञात तरुणाने चर्चमध्ये प्रवेश केला. तो प्रथम चर्चच्या प्रार्थनागृहात गेला. तेथे जाऊन प्रार्थना केली. त्यानंतर चर्च परिसरात तोडफोड केली. अवघ्या काही मिनिटांत आरोपीने हा प्रकार केला. ही बाब चर्चच्या सुरक्षा यंत्रणेला कळताच या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न झाला; मात्र तो सुरक्षारक्षकाला धक्का देऊन तेथून फसार झाला. सकाळी लोक प्रार्थनेसाठी जात असताना हा तरुण चर्चमध्ये घुसल्याने त्याच्यावर कोणीही संशय घेतला नाही. सेंट मायकल चर्चकडून या घटनेबद्दल खेद व्यक्त करण्यात आला असून पोलिस तपास करून आरोपीला पकडतील अशी आशा व्यक्त केली आहे.