
भारत-जपानचा संयुक्त युद्धाभ्यास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : भारत आणि जपान या देशांच्या वायुसेनांच्या परस्पर सहकार्याला चालना देण्यासाठी, भारत आणि जपान दोन्ही देशांच्या वायुसेना एकत्र युद्धाभ्यास करणार आहेत. १२ जानेवारीपासून २६ जानेवारीपर्यंत जपानच्या हयाकुरी हवाई तळावर भारतीय वायुदल आणि जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स संयुक्त युद्धाभ्यास करणार आहेत. ‘वीर गार्डियन-२०२३’ असे संयुक्त कार्यक्रमाला नाव देण्यात आले आहे. हवाई युद्धाभ्यासात सहभागी होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या तुकडीत ४ सु-३० एमकेआय, २ सी-१७ ग्लोबमास्टर आणि १ आयएल-७८ ही विमाने असतील; तर जापानी वायुसेनेतर्फे ४ एफ-२ आणि चार एफ-१५ नावाची विमाने सहभागी होतील.
८ सप्टेंबर २०२२ रोजी टोकियो, जपान येथे झालेल्या दुसऱ्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रीस्तरीय बैठकीत भारत आणि जपानने द्विपक्षीय संरक्षण सहकार्य वाढवण्यास आणि पहिल्या संयुक्त लढाऊ जेट कवायतींसह अधिक लष्करी सरावांमध्ये सहभागी होण्याचे निर्णय घेतले होते. दोन्ही बाजूंनी सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी तसेच देशांमधील धोरणात्मक संबंध अधिक घनिष्ठ करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले. युद्धाभ्यासामध्ये दोन्ही हवाई दलांमधील विविध हवाई लढाऊ कवायतींचा समावेश असेल. दोन्ही देशांचे तज्ज्ञ विविध ऑपरेशनल पैलूंवर त्यांचे कौशल्य सामायिक करण्यासाठी चर्चा करतील. ‘वीर गार्डियन’ या सरावामुळे मैत्रीचे दीर्घकालीन बंध दृढ होतील आणि दोन्ही हवाई दलांमधील संरक्षण सहकार्याचे मार्ग प्रशस्त करतील.