
एमएमआर क्षेत्रात सापडला बीक्यू-१.१ पहिला रुग्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : अमरिकेत हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन बीक्यू-१.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण एमएमआर क्षेत्रात सापडला आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेला या प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या महिलेमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आली नसून घरीच आयसोलेशन असल्याने ती महिला बरीही झाली आहे. दरम्यान, तज्ज्ञांनी सांगितले, की आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण आपल्याला माहिती नाही की विषाणू कशा प्रकारे उत्परिवर्तित होईल.
चीनसह अनेक देशांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर केंद्र सरकारने विमानतळावर येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची सरप्राईज टेस्टिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. २४ डिसेंबरपासून मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळावर एकूण २,२९,७६७ प्रवासी दाखल झाले आहेत, त्यापैकी ५,०७१ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून ११ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले.
पालिका आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, ११ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी नऊ जण मुंबई विमानतळावर उतरले असून त्यापैकी दोन प्रवाशांना बीक्यू-१.१ उप-प्रकारची लागण झाल्याचे आढळले आहे. एक प्रवासी गोव्याचा; तर दुसरा नवी मुंबईचा आहे. बाधित व्यक्ती २८ डिसेंबरला स्वित्झर्लंडच्या झुरिच येथून आली होती. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, की ही महिला लक्षणे नसलेली होती. सध्या घाबरण्याची गरज नाही. या रुग्णाबाबत संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांनाही माहिती देण्यात आली आहे. तसेच त्यांना आयसोलेशनमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले होते.
...
सतर्क राहणे गरजेचे!
कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले, की आतापर्यंत आम्हाला येथे एकही केस दिसली नाही. व्हायरस कसा वागेल हे सांगणे फार कठीण आहे. आपण सतर्क राहून स्वतःचा बचाव केला पाहिजे.
...
दोन मुंबईचे रहिवासी
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार शहरात परदेशातून आलेल्या आणि पॉझिटिव्ह नऊ प्रवाशांपैकी दोन मुंबईचे रहिवासी आहेत. एक मालाड येथील रहिवासी ३६ वर्षीय महिला असून ती ३० डिसेंबरला लंडनहून परतली होती आणि दुसरी अंधेरी पूर्व येथील रहिवासी असलेली २६ वर्षीय महिला असून ती ४ जानेवारीला व्हिएतनामहून परतली होती. दोन्ही पॉझिटिव्ह रुग्णांचे जिनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट येणे बाकी आहे.