
मनोरुग्ण महिलेची सुखरूप घरवापसी
मानखुर्द, ता. ८ (बातमीदार) ः कर्नाटकातून बेपत्ता झालेल्या मरियम तबस्सुम या मनोरुग्ण महिलेला मानखुर्द पोलिसांनी तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात देऊन सुखरूप घरवापसी केली. मागील महिन्यात ही महिला रात्रीच्या वेळी एकटीच शीव-पनवेल महामार्गालगत मानखुर्द पोलिसांच्या मोबाईल पाचच्या पथकाला आढळली होती.
न्यायालयाच्या आदेशाने तिला ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोरुग्णालयातील परिचारिका प्रवीणा देशपांडे यांच्या मदतीने उपनिरीक्षक दिनेश शेळके यांनी तिच्या कुटुंबीयांविषयी माहिती मिळवली. चौकशीदरम्यान ती कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील असल्याचे तिने सांगितले. त्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक दिनेश शेळके यांनी गुलबर्गा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर वॉटसॲपच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. खात्री झाल्यानंतर तिचा भाऊ मकसूद अली याला घेऊन गुलबर्गा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गरुडाप्पा, महिला पोलिस शिपाई खाजाबी व शिपाई चंद्रकांत हे पथक मनोरुग्णालयात दाखल झाले. त्या ठिकाणी ओळख परेडमध्ये मरियमने भावाला ओळखले. त्यानंतर न्यायालयामध्ये कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर तिला शनिवारी (ता. ७) भावाच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, काही कारणास्तव तिचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे बसलेल्या धक्क्यामुळे तिला मानसिक आजार जडल्याचे तपासातून समोर आले.
घटनाक्रम
एक महिन्यापूर्वी रात्री अकराच्या सुमारास मानखुर्द पोलिसांना मरियम सापडली.
तिच्या सुरक्षेच्या उद्देशाने पथकाने तिला ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात आणले.
शताब्दी रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी केली.
जोगेश्वरी येथील सखी वन स्टॉप सेंटरमध्ये दाखल केले.
जे. जे. रुग्णालयात पुन्हा तपासणी केली.
त्या तपासणी अहवालासह तिला कुर्ला न्यायालयात हजर केले.
न्यायालयाने तिच्यावर मानसिक उपचारासाठी ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले.
त्या आदेशानुसार पथकाने तिला त्या ठिकाणी दाखल केले.
तेथील परिचारिका प्रवीणा यांच्या मदतीने माहिती घेऊन तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले.