वसई-विरारमध्ये कचऱ्याचा प्रश्न अधांतरित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विरारमध्ये कचऱ्याचा प्रश्न अधांतरित
वसई-विरारमध्ये कचऱ्याचा प्रश्न अधांतरित

वसई-विरारमध्ये कचऱ्याचा प्रश्न अधांतरित

sakal_logo
By

संदीप पंडित : सकाळ वृत्तसेवा
विरार, ता. ८ : वसई-विरार शहर वाढत असले, तरी कचऱ्याचा प्रश्न मात्र अजून सुटलेला नाही. महापालिकेकडे मोठे डम्पिंग ग्राऊंड नसल्याने शहरातील कचरा भोयदा पाडा येथील डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जात आहे. येथे कचऱ्याला आग लागण्याच्या घटना घडत असल्याने वायुप्रदूषणात भर पडत आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या जवळपास २५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे शहरातून दररोज ८०० टनापेक्षा अधिक कचरा जमा होत आहे. हा कचरा १२० हून अधिक कचरा गाड्यांमधून भोयदा पाडा येथील कचराभूमीत टाकला जात आहे. महापालिकेची एकमेव कचराभूमी असलेल्या भोयदा पाडा येथेही कचऱ्याचा मोठा डोंगर उभा राहिला आहे. पालिकेतर्फे कचरा व्यवस्थापनासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे; पण पालिका स्थापनेला ११ वर्षे उलटली, तरीही कचरा समस्या कायम आहे. याशिवाय डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याला लागणाऱ्या आग आणि त्यातून निघणाऱ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासह हवेचे प्रदूषणही होत असल्याचे दिसून आले आहे.
शहरातील रहिवाशांकडून ओला आणि सुका कचरा वेगळा जमा करण्याचे आवाहन केले जात आहे; पण त्याला अद्याप म्हणावे तसे यश आलेले नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवू पाहणाऱ्या पालिकेला यामुळे अडथळा निर्माण होत आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने जेव्हापासून स्वच्छ सर्वेक्षण मोहीम हाती घेतल्यानंतर सर्वत्र कचरा वर्गीकरणाची सुरुवात झाली होती. त्यानुसार वसई-विरार महापालिकेनेदेखील ओला व सुका कचरा वेगळा जमा व्हावा, यासाठी कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले होते. तसेच कचरा वर्गीकरण आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करून नागरिकांना आवाहन केले होते. डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे मोठ्या प्रमाणावर ढीग जमा झाले आहेत. त्यांना आग लागल्याचे प्रकारदेखील नियमित घडत असून यामुळे वायुप्रदूषण होत असते. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण मंडळासह हरित लवादानेही पालिकेला प्रतिदिन साडेदहा लाख रुपये इतका दंड ठोठावलेला आहे. दुसरीकडे हरित लवादाने हा दंड वसूल करण्याचे आदेशही दिले आहेत.
======
श्वसन आजार बळावले
मागील काही वर्षांपासून वाढते प्रदूषण व कचराभूमीतून निघणारी दुर्गंधी आणि धुरामुळे वसई-विरार शहराची हवा बाधित झाली आहे. त्यामुळे शहरात श्वसनाशी निगडित आजारांचे रुग्ण वाढत आहेत. जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत केलेल्या क्षयरोग सर्वेक्षणादरम्यान शहरात क्षयरोगाचे ३,४६४ रुग्ण आढळले आहेत. या सर्वेक्षणात वालीव विभागात २९७, विरारमध्ये ९३१, धानीव ४९३, आंबेडकर नगर ८७८ आणि आचोळे विभागात ८६५ इतक्या रुग्णांची नोंद झाल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने म्हटले आहे; तर जूचंद्र ८१, नवघर ६७, पेल्हार १८७, सातिवली १३०, वालीव १३२ व परिसरातील खासगी क्षेत्रात ५२ अशी एकूण मिळून ग्रामीण परिसरात ४४९ इतकी क्षयरुग्णांची संख्या असल्याचे समजते.
======
महापालिकाच करणार कचरा व्यवस्थापन
कचरा संकलन आणि प्रक्रिया करण्यासाठी महापालिका दरमहिना १४ कोटी रुपयांचा खर्च करत आहेत. वसई-विरार महापालिका क्षेत्रातून निघणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन यापुढे महापालिका स्वतः करणार आहे. यासाठी महापालिकेने १० ट्रॉमिल, पाच पोकलेन (ब्रेकर), दोन लॉन्ग बूम, दोन शॉर्ट बूम, ५० ट्रिपर आणि १० कॉम्पॅक्टर अशी भली मोठी यंत्रसामग्रीची ऑर्डर केलेली आहे.
==========
प्रदूषणात भर
महापालिका जाणीवपूर्वक डम्पिंग झोनच्या पाच किलोमीटरच्या परिसरात कुठेही वायू चाचणी यंत्र हे बसवत नाही. २०१४ साली वायू चाचणी यंत्रासाठी टेंडर काढले होते. परंतु त्याचे पुढे काय झाले हे मात्र गुलदस्त्यातच राहिले. आताच्या घडीला जवळपास १५ लाख टन कचरा गोळा झालेला असावा असा अंदाज आहे. या कचऱ्यामधून रासायनिक सांडपाणी निघत असून ते परिसरातील जलस्रोतात मिसळते. त्यानंतर नाल्यातून समुद्रात जाणाऱ्या पाण्यामुळे समुद्रातही प्रदूषण होत आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते चरण भट यांनी दिली.