सत्ताधाऱ्यांकडून धर्माचे गाजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्ताधाऱ्यांकडून धर्माचे गाजर
सत्ताधाऱ्यांकडून धर्माचे गाजर

सत्ताधाऱ्यांकडून धर्माचे गाजर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : सत्ताधारी महागाई, बेरोजगारी या गंभीर विषयांवर न बोलता धर्मावर बोलत आहेत. नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून धर्माचे गाजर दाखवण्यात येत आहे. या देशात जन्माला आलेले हिंदू -मुस्लिम येथेच मरणार आहेत. मतदारांनी तुम्हाला धर्म-जातीवर बोलण्यासाठी निवडून दिलेले नाही. तुम्हाला बेरोजगारी कमी करण्यासाठी निवडून दिले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली जनजागर यात्रा आज (ता. ८) ठाण्यात दाखल झाली. माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली विटावा, कळवा, खारीगाव-पारसिक नगर आदी भागात यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारच्या चुकीचा धोरणांचा पर्दाफाश करण्यात आला. त्या वेळी विद्या चव्हाण बोलत होत्या. या वेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा कविता म्हेत्रे, ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, ठाणे-पालघर विभागीय महिलाध्यक्षा ऋचा आव्हाड हे मंचावर उपस्थित होते.

महागाई आणि बेरोजगारीविरोधात एल्गार पुकारत आज राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर यात्रा राज्यभर फिरत आहे. गेल्या आठ वर्षांत महागाई व बेरोजगारीविषयी केंद्र सरकार एकही शब्द काढत नाही. देशातील गरिबांचे जगणे असह्य झाले आहे. लोकसभेसाठी निवडणूक पाठविले आहे, ते मोदींना प्रश्न विचारत नाहीत. म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरून थेट मोदींना प्रश्न विचारत आहोत. सामान्यांना चारशे रुपयात सिलिंडर, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. मोदींनी कामगार कायदे रद्द केले आहेत. देशातील शेतकरी आत्महत्या करत असून मोदींनी धनाढ्यांना देश विकला आहे. स्वातंत्र्यानंतर या देशात सुई तयार होत नव्हती; पण नेहरू, शास्त्री, गांधी यांनी देशाच्या प्रगतीसाठी क्रांती केली. त्यांनी देशासाठी त्याग केला. त्यांच्यावरच हे मोदी सरकार टीका करीत आहे. नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी भगव्या रंगाचा वापर केला जातो. भगवे वस्त्र परिधान करून कोणी साधू-संत होत नाही. गुंडागर्दी करून कालिचरणसारख्या गुंड प्रवृत्तीला साधुसंत म्हणण्याइतके आम्ही मूर्ख नाही, असे विद्या चव्हाण यांनी म्हटले.