
पेन्शन फंड अॅथॉरिटी मालमत्ता ९ लाख कोटी
मुंबई, ता. ८ ः पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटीच्या (पीएफआरडीए) व्यवस्थापनाखालील मालमत्तेचे मूल्य आता ९ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. ही माहिती अध्यक्ष सुप्रतिम बंडोपाध्याय यांनी नुकतीच येथे दिली.
आधी ही मालमत्ता वर्षअखेरपर्यंत दहा लाख कोटी रुपयांवर जाण्याची आम्हाला अपेक्षा होती. मात्र रशिया-युक्रेन युद्ध, तसेच जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे शेअर बाजारात बरेच चढ-उतार आले. त्यामुळे आता आमच्या मालमत्तेचे मूल्यांकन नऊ लाख कोटी रुपयांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे, असेही बंडोपाध्याय म्हणाले. डिसेंबर २०२१ पर्यंत फंडाकडे १.३ लाख कोटी रुपयांचा नवा निधी आला होता, तर डिसेंबर २०२२ पर्यंत १.५ लाख कोटी रुपयांचा नवा निधी आला आहे. नुकत्याच संपलेल्या वर्षअखेरपर्यंत नॅशनल पेन्शन स्कीम व अटल पेन्शन योजनेचे सभासद २४ टक्क्यांनी वाढले. जानेवारी २०२२ मध्ये ही संख्या चार कोटी ८६ लाख होती, तर आता ही संख्या सहा कोटींपेक्षा जास्त झाली आहे. नॅशनल पेन्शन स्कीमच्या अंतर्गत मिनिमम अॅशुअर्ड रिटर्न स्कीम सुरू करण्यासाठी तिचा तपशील संचालक मंडळाला देण्यात आला असून आता त्यावर चर्चेअंती निर्णय होईल, असेही अध्यक्ष म्हणाले. हा निर्णय आठवडाभरात अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.