
उजव्या बाजूने चाला, अपघात टाळा!
नवीन पनवेल, ता. ९ (वार्ताहर)ः समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या गोष्टींचे अनुकरण करण्याची चढाओढ सध्या लागलेली आहे. अशातच सध्या पादचाऱ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजुने जावे, असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांकडून व्हायरल केला जात आहे. अशातच मॅार्निंग वॅाकसाठी बाहेर पडणाऱ्यांचे होणारे अपघात टाळण्यासाठी हा व्हिडीओ मार्गदर्शक ठरत आहे.
रस्त्यावर होणाऱ्या अपघातांसाठी फक्त वाहन चालकांना दोष देऊन चालणार नाही. अपघाताला अन्य घटकही कारणीभूत ठरतात. त्यामुळे रस्त्यावरील पादचाऱ्यांनीदेखील काही गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे आहे. अशातच रस्त्यांच्या उजव्या बाजूने चालल्यास समोरून येणाऱ्या वाहनाचा निश्चित अंदाज बांधून सुरक्षितता घेता येऊ शकते. या आशयाचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर चर्चेत आहे. कारण सध्या सकाळी मॅार्निंग वॅाक करणाऱ्यांची देखील संख्या लक्षणीय वाढली आहे. अशातच रस्त्याच्या कडेला चालताना खबरदारी घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असून रस्ते वाहतुकीच्या १९८८ मध्ये झालेल्या कायद्यातही रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे, असे स्पष्ट आहे.
----------------------------------------
रस्ते वाहतूक कायदा १९८८ आणि नियम १९८९ नुसार ज्या ठिकाणी फूटपाथ नाहीत, त्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे. त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसते. विशेषतः मॉर्निंग वॉकसाठी जाताना हा नियम महत्त्वाचा आहे.
- गजानन ठोंबरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल
-----------------------------
वर्षानुवर्षे आपल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूने चालण्याचे संस्कार झाले आहेत. पूर्वीपेक्षा आता वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे रस्त्यांवरून चालताना पदोपदी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली.
-नीलेश धोटे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल