
सिडकोच्या भूखंडावर अतिक्रमण
खारघर, ता. १० (बातमीदार) : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मिठागरे आणि खारफुटीच्या जमिनीवर कोणतेही काम करू नये, असे आदेश आहेत; मात्र खारघरमध्ये खाडीकिनाऱ्यालगत सिडकोच्या जमिनीचे सपाटीकरण करून भाजीपाल्याचा व्यवसाय केला जात आहे. त्यामुळे सिडको कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर होणाऱ्या या प्रकाराकडे अधिकाऱ्यांची होणारी डोळेझाक चर्चेचा विषय बनला आहे.
खारघर, सेक्टर आठ आणि दहाला लागून असलेल्या खाडीकिनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे या परिसरात कोणीही फिरकत नाही. अशातच सिडकोच्या अखत्यारीत असलेल्या तीन एकरातील जमिनीवर परप्रांतीयांकडून भाजीपाला पिकवला जात आहे. या भाजीपाल्यासाठी लागणारे पाणी गटार तसेच जवळच असलेल्या खाडीतून घेतले जात असून पिकविलेल्या भाजीपाल्याची दादर, भायखळा, वाशी परिसरातील मार्केटमध्ये विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे, ही जागा जरी सिडकोची जरी असली तरी काही मंडळींकडून भाजीपाला उत्पादन करणाऱ्या परप्रांतीयांना भाड्याने दिली गेली आहे. त्यामुळे सिडको भूखंडावरील भाजीपाला विक्रीचा हा व्यवसाय सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
-----------------------
दीड ते दोन तासांत मार्केटमध्ये विक्री
ऑक्टोबर ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत या जमिनीवर मेथी, पालक, चवळी, मुळा आदी भाजीपाला पिकवला जातो. हा भाजीपाला काही ठेकेदाराकडून वाशी, दादर आणि भायखळा मार्केटमध्ये दररोज पाठवला जातो. दीड ते दोन तासांत वाहनाद्वारे पाठवण्यात येणारा भाजीपाला हिरवागार आणि ताजा असल्यामुळे त्याला मागणीदेखील मोठ्या प्रमाणात आहे; पण त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामुळे आरोग्यासाठी हा भाजीपाला घातक असल्याचा दावा स्थानिकांचा आहे.
----------------------------
तीनशे कामगार कार्यरत
खारघर रेल्वे स्थानक ते कोपरागाव आणि कोपरा खाडीकिनारा परिसरात असलेल्या जागेचे खोदकाम करून भाजीपाला पिकविला जातो. येथे भाजीपाला लावणे-काढणे, जमिनीच्या मशागतीसाठी जवळपास तीनशे कामगार आहेत. सर्व कामगार हे उत्तर प्रदेशातील असून मासिक बारा ते पंधरा हजार पगार राहण्यासाठी मोफत सुविधा असल्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती नसल्याचे कामगार सांगतात.
---------------------------------------
खारघरमध्ये सिडकोच्या जागेत होत असलेल्या भाजीपाल्याविषयी पाहणी करून पुढील कारवाई केली जाईल.
- सुरेश मेंगडे, मुख्य दक्षता अधिकारी सिडको