राज्य अतिथींच्या वाहनांमध्ये हेराफेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य अतिथींच्या वाहनांमध्ये हेराफेरी
राज्य अतिथींच्या वाहनांमध्ये हेराफेरी

राज्य अतिथींच्या वाहनांमध्ये हेराफेरी

sakal_logo
By

प्रशांत कांबळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : राजशिष्टाचार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय परिवहन सेवेतील (जीटीएस) राज्य अतिथींच्या वाहनांचा बेकायदा वापर करून त्या वाहनांमधील पार्ट वारंवार कारण नसताना बदलण्यात आल्याचा धक्कादायक अहवाल पुढे आला आहे. जीटीएसचे तत्कालीन नियंत्रक किशोर गायकर त्यांच्या कार्यकाळात राज्य अतिथींच्या वाहनांचा गैरवापर करत माया जमवल्याचा आरोप जीटीएसच्या चालक संघटनेने केला होता. त्यावरून गायकर यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करून त्यांच्याविरोधात चौकशी सुरू केली होती. परिवहन विभागाला तांत्रिक चौकशीचे आदेश मोटार वाहन निरीक्षक सुनील देशमुख यांना दिले होते. त्यांचा गोपनीय अहवाल ‘सकाळ’च्या हाती लागला आहे.

‘सकाळ’ने राज्य अतिथींच्या वाहनांच्या बेकायदा वापर करण्याचे प्रकरण उघड केले होते. त्यानंतर राजशिष्टाचार विभागाने तत्कालीन संचालक सतीश जोंधळे आणि नियंत्रक किशोर गायकर यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. जीटीएस नियंत्रकांचा कारभार तांत्रिक अधिकाऱ्यांकडे राहण्याची गरज असताना अतांत्रिक व्यक्तींकडे नियंत्रकांचा प्रभार सोपवण्यात आला होता. परिणामी, गायकर आणि जोंधळे यांच्यावरील आरोपातील सत्यता पडताळणीसाठी परिवहन विभागाला तांत्रिक तपासणीचे आदेश दिले होते. मात्र ज्यामध्ये एकूण ४२ वाहनांची १ मे २०१९ ते ३१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत करण्यात आलेल्या वारंवार दुरुस्ती, बदलण्यात आलेले सुटे भाग खरेदीची तपासणी करायचे होते. मात्र फक्त सात वाहनांचीच तपासणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये अनेक गंभीर बाबी उघड होताना दिसून येत असल्याचे देशमुख यांनी चौकशी अहवालात म्हटले आहे.

अहवालातील खुलासे
- वाहनांमध्ये एकाच प्रकारची दुरुस्ती वारंवार.
- बिलांमध्ये भागांच्या पार्ट नंबरांच्या नोंदी नाहीत.
- पार्ट नंबर नोंदवण्याबद्दलची प्रक्रियाच नाही.
- सुटे भाग नवेच वापरले असतील याची शाश्वती नाही.
- दोन वर्षांत सात वाहनांची प्रमाणापेक्षा जास्त दुरुस्ती.

एका वर्षात वाहनांवर झालेला अवाजवी खर्च
- एमएच१एएन८३८४ स्कोडा - ३ लाख ९ हजार
- एमएच१एन९०९१ स्कोडा - ४ लाख १३ हजार
- एमएच १ एन ९२९३ - ३ लाख ३५ हजार
- एमएच १ एन १७०७ - १ लाख ५२ हजार
- एमएच १ एन १७०८ - १ लाख १७ हजार
- एमएच १ एन ४८४९ - ३ लाख ५७ हजार
- एमएच १ सीपी २३९१ - १ लाख ४१ हजार