
मुंबई विमानतळावर २८ कोटींचे कोकेन जप्त
मुंबई, ता. १० : मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६ जानेवारीला केलेल्या कारवाईत एका भारतीय प्रवाशाला २.८१ किलो कोकेनसह अटक केली. पकडलेल्या अमली पदार्थांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २८.१० कोटी एवढी आहे. आरोपी प्रवाशाने आपल्या बॅगेत बनवलेल्या गुप्त कप्प्यात अमली पदार्थ लपवून आणले होते.
आरोपी प्रवाशाने एका महिलेशी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर मैत्री केली होती. महिलेने आरोपी प्रवाशाला नोकरी देण्याचे प्रलोभन दाखवले. त्यासोबतच त्यांच्याशी गोड बोलून जवळिक साधली. तसेच शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रलोभन दाखवले. या सगळ्यात फसून आरोपी प्रवाशाने आफ्रिकेतील अदीस अबाबा येथून कोकेन घेऊन मुंबई विमानतळावर आणले. पुढे मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये आरोपी प्रवास करणार होता. अटक प्रवाशाला मुंबईतील न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून या टोळीमागचा खरा सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.