
बाळासाहेबांची शिवसेना-लहुशक्ती एकत्र
मुंबई, ता. १० : मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असणाऱ्या मातंग समाजाने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र परिवर्तन सेना (लहू शक्ती) युती करणार असल्याची माहिती पक्षप्रमुख अध्यक्ष धनराज थोरात यांनी दिली.
नुकतीच बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) यांनी युती केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र परिवर्तन सेना (लहू शक्ती) बाळासाहेबांची शिवसेनासोबत आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी युती करणार आहे. महाराष्ट्रात बाळासाहेबांची शिवसेनासोबत शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र आल्याने आता लहूशक्तीसुद्धा येण्यास तयार झाली आहे. यासाठी पक्षप्रमुख धनराज थोरात यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन दिले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुंबईतील १ लाख मातंग समाजाची मते वाया जाऊ नयेत, यासाठी थोरात यांनी शिंदे गटासोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे.
...
लवकरच मेळावा
युतीच्या निमित्ताने राज्यभरातील तसेच मुंबईतील मातंग समाजाचा मेळावा लवकरच मुंबईत आयोजित करण्यात येईल. त्यासाठी पक्षप्रमुख धनराज थोरात हे खासदार गजानन कीर्तिकर, खासदार राहुल शेवाळे आणि माजी मंत्री रामदास कदम यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीनंतरच युतीची घोषणा होईल, असेही थोरात यांनी सांगितले.