पोक्सोअंतर्गत तिघांना २० वर्षे सक्तमजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोक्सोअंतर्गत तिघांना २० वर्षे सक्तमजुरी
पोक्सोअंतर्गत तिघांना २० वर्षे सक्तमजुरी

पोक्सोअंतर्गत तिघांना २० वर्षे सक्तमजुरी

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ११ (बातमीदार) ः अल्पवयीन मुलीचे दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून न्यायालयाने तीन आरोपींना २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. पीडित मुलीचे मुख्य आरोपीशी लग्न ठरवण्यात आले होते; मात्र ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही त्याने तिच्यावर अत्याचार केला होता. त्यामुळे तिघांवर पोक्सो गुन्ह्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.
पोक्सो गुन्ह्यातील आरोपी दिलीप पटेल (वय ३२) याच्यासह मंगेश इंगळे (३०) व चेतना इंगळे (२५) या दाम्पत्याला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. निरीक्षक किशोर खरात यांनी गुन्ह्याचा तपास केला व साक्षीपुरावे गोळा केले होते. त्याआधारे न्यायालयात दोष सिद्ध झाले व न्यायालयाने तिघांना शिक्षा सुनावली.
मंगेश व चेतना पती-पत्नीने पीडित मुलीचे दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात दिलीप पटेल याच्याशी लग्न ठरवले होते. पीडितेच्या पालकांना त्याची कल्पना न देता त्यांनी तिला दिलीपच्या बोरिवली येथील घरी नेले. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत दिलीपने ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिच्यावर अत्याचार केले. तिने विरोध केला म्हणून मारहाणही केली. त्यानंतर पीडितेच्या आईने मानखुर्द पोलिसांत तिघांविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार पोक्सो कायद्यासह विविध कलमांतर्गत तिघांविरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा निकाल न्यायालयाने देत पीडितेला न्याय दिला. गेल्या आठवड्यात तिघांवरील गुन्हा सिद्ध झाल्यामुळे कुर्ला सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. जाधव यांनी दिलीपला २० वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड सुनावला. इंगळे पती-पत्नीला कलम ३६६ (अ) अंतर्गत ३ वर्षे सक्तमजुरी व ३ हजार रुपये दंड तसेच पोक्सो कायद्यांतर्गत २० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अधिक शिक्षा तिघांनाही भोगावी लागणार आहे.