
सोसायटीची समिती बदलल्याचा रागाने जीवघेणा हल्ला
ठाणे, ता. ११ (वार्ताहर) : सोसायटीच्या सभासदांनी गैरव्यवहार केल्याच्या आरोपातून रवी व्यकंटराव पस्परेड्डी (वय ४२) यांनी समिती बरखास्त केली. नवीन समिती निवडल्याचा राग मनात धरून दोघांनी त्यांच्यावर तलवारीने वार करून पोबारा केला. याप्रकरणी चितळसर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. ठाणे पश्चिमेतील धर्मवीनगरमधील प्रताप सोसायटीचे रवी व्यकंटराव पस्परेड्डी हे सभासद आहेत. सदर सोसायटीमध्ये मार्टीन सेंट्रिक आयझेक (वय २८) आणि स्टॅलिन सेंट्रिक आयझेक (वय ३०) हे समितीचे पदाधिकारी होते. या दोघांनी समितीच्या पैशांमध्ये अफरातफर केली होती. त्यामुळे पस्परेड्डी आणि इतर लोकांनी जुनी समिती बरखास्त करून नवीन कार्यकारिणी बनवली. याचा राग मार्टिन आणि स्टॅलिन यांना आल्याने मंगळवारी (ता. १०) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पस्परेड्डी हे इमारतीच्या खाली आल्यानंतर तलवारीने त्यांच्यावर वार केले.