
बोईसर आगारात योग, प्राणायामांचे प्रात्यक्षिक
मनोर, ता. १२ (बातमीदार) : रस्ते सुरक्षितता मोहिमेअंतर्गत राज्य परिवहन मंडळाच्या बोईसर आगारातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अभियानांतर्गत प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास निर्माण करणे, एसटी कर्मचाऱ्यांना सुरक्षित प्रवासी वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव आणि अपघातविरहित वाहन चालवणे इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अपघातांची संख्या कमी करून रस्ता सुरक्षिततेवर भर देणार असल्याचे पालक अधिकारी उज्ज्वला साळवी यांनी सांगितले. बोईसर आगारातर्फे सडक सुरक्षा व जीवन सुरक्षा सुरक्षित मोहिमेचा शुभारंभ पतंजलीचे जिल्हा युवा प्रभारी प्रा. सुधीर भांडवलकर यांच्या हस्ते करण्यात आला. रस्ता सुरक्षितता मार्गदर्शनाबरोबरच मनःशांती आणि तणावमुक्त सेवा देण्यासाठी योग आणि प्राणायामांचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. या वेळी आगार व्यवस्थापक राजू पाटील, कार्यशाळा अधीक्षक नितीन वझे, एसटीचे कर्मचारी उपस्थित होते.